१९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधून बुमराह टीम इंडियात कमबॅक करणार आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कोच रवी शास्त्रीने जसप्रीत बुमराहला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. बुमराहने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणं टाळलं पाहिजे आणि वर्कलोड मॅनेज करण्यासाठी टेस्ट क्रिकेटवर जास्त फोकस केला पाहिजे, असं शास्त्री म्हणाला. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी बुमराहला फिट ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (वनडे आणि टी-२०) फक्त गरजेनुसारच खेळवावं, असंही शास्त्रीने सुचवलं आहे.
३२ वर्षांच्या बुमराहची टीम इंडियाला पुढच्या महत्त्वाच्या मॅचेसमध्ये खूप गरज आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन टेस्ट मॅचेससाठी त्याला राखून ठेवलं पाहिजे, असं शास्त्रीने स्पष्ट केलं. सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सिरीजमधून बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
१९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये सुरू होणाऱ्या दोन टेस्ट मॅचेसच्या सिरीजमधून बुमराह टीम इंडियात परतणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धची ही टेस्ट सिरीज जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. शुभमन गिलच्या कॅप्टन्सीखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उरलेल्या मॅचेसमध्ये मोठे विजय मिळवावे लागतील, याकडेही रवी शास्त्रीने लक्ष वेधलं. भारतासमोर आता न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही टेस्ट आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचपैकी किमान चार मॅचेस जिंकण्याचं मोठं आव्हान आहे.








