Palash Muchhal Proposes to Smriti Mandhana : ज्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारताने विश्वचषक उचलला होता, तिथेच पलाशने स्मृतीला प्रपोज केले.

Palash Muchhal Proposes to Smriti Mandhana : सर्व चर्चांना पूर्णविराम देत संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाला प्रपोज करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकला होता, त्याच ठिकाणी पलाशने स्मृतीला स्वप्नवत प्रपोज केले. डी.वाय. पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर स्मृतीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला आणले आणि मैदानाच्या मधोमध गुडघ्यावर बसून पलाशने तिला प्रपोज केले.

पलाश मुच्छलसोबतच्या साखरपुड्याची घोषणा स्मृतीने काल सोशल मीडियाद्वारे अधिकृतपणे केली होती. भारतीय खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि अरुंधती रेड्डी यांच्यासोबत चित्रित केलेल्या व्हिडिओद्वारे स्मृतीने तिच्या चाहत्यांना साखरपुड्याची माहिती दिली होती. रविवारी पलाश मुच्छलसोबत स्मृतीचे लग्न आहे.

View post on Instagram

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान कार्यालयाकडून स्मृती आणि पलाशला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देणारे पत्र पाठवण्यात आले होते. यापूर्वी, भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर पलाशने त्याच्या डाव्या हातावर स्मृतीच्या जर्सी नंबरची आठवण म्हणून 'SM 18' असा टॅटू गोंदवल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. 2019 मध्ये ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले. 2024 पर्यंत त्यांनी आपली प्रेमकथा खाजगी ठेवली होती, जी गेल्या वर्षी सार्वजनिक झाली.

View post on Instagram

विश्वचषकात स्मृती मानधना भारताची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती, तिने 54.25 च्या सरासरीने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 434 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डनंतर ती स्पर्धेत दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. नवी मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध केलेली 109 धावांची खेळी ही विश्वचषकातील तिची सर्वोत्तम कामगिरी होती.

शतकापूर्वी तिने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे 80 आणि 88 धावा केल्या होत्या. स्मृतीचा ICC च्या विश्वचषक 2025 संघातही समावेश करण्यात आला आहे, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या संघात स्थान मिळवलेल्या इतर दोन भारतीय खेळाडू आहेत.