Mohammad Amir: पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद आमिरने पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे. T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंड टीम इंडियाचा पराभव करेल, असं त्याचं म्हणणं आहे.

अहमदाबाद: पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर मोहम्मद आमिरने T20 वर्ल्ड कप फायनलबाबत एक खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंड जिंकेल आणि टीम इंडियाचा पराभव होईल, असं आमिरने म्हटलं आहे. विशेष म्हणजे, याआधी आमिरने भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही आणि नंतर फायनलमध्येही जाणार नाही, असं भाकीत केलं होतं. पण त्याचे दोन्ही अंदाज चुकवत सूर्यकुमार यादवच्या टीमने फायनल गाठली आहे.

सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिज आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडला मात देत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. पण न्यूझीलंडची बॉलिंग आणि फिल्डिंग भारतापेक्षा सरस आहे, असा दावा आमिरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर केला आहे.

‘न्यूझीलंड टीम इंडियाला चांगलीच टक्कर देईल’

आमिर म्हणाला, ''ही काही मुंबईच्या खेळपट्टीसारखी नसेल. अहमदाबादमध्ये पेस आणि बाऊन्स दोन्ही मिळेल. न्यूझीलंड टीम इंडियाला चांगलीच टक्कर देईल. दोन्ही टीम्स फायनलमध्ये पोहोचल्या ही मोठी गोष्ट आहे. पण तरीही मला वाटतं की बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये न्यूझीलंडचं पारडं थोडं जड आहे.'' इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला नशिबाचीही साथ मिळाली, असंही आमिरने जोडलं.

हॅरी ब्रूकने संजू सॅमसनचा आणि टॉम बँटनने हार्दिक पांड्याचा कॅच सोडल्यामुळे मॅचचं चित्रच पालटलं. न्यूझीलंडने इंग्लंडसारख्या चुका केल्या नाहीत, तर ते भारताला हरवू शकतात, असं आमिरचं म्हणणं आहे.

ग्रुप स्टेजमध्ये सर्व मॅच जिंकणाऱ्या भारताला सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली होती. पण त्यानंतर झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला हरवून टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम आणि मायदेशात वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश बनण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या टीम इंडियाच्या नजरेसमोर आहे.