चेन्नईत सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने बॅटिंगचा जलवा दाखवला आहे. त्याने दोन डावांमध्ये मिळून एकूण ३५० धावा करत, ३९ वर्ष जुना विक्रम मोडला आणि एकाच फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

चेन्नई: दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये साऊथ झोनविरुद्ध दुसऱ्या डावातही स्फोटक अर्धशतक झळकावत ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या अंतिम सामन्यात इशानने दोन्ही डावांमध्ये मिळून तब्बल ३५० धावा केल्या. या कामगिरीमुळे तो दुलीप ट्रॉफीच्या एकाच फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

पहिल्या डावात २७० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या इशानने गुरुवारी दुसऱ्या डावात ९८ चेंडूंत ८० धावांची खेळी केली. यासोबतच त्याने रमण लांबा यांचा ३९ वर्ष जुना विक्रम मोडला. लांबा यांनी १९८७ मध्ये वेस्ट झोनविरुद्ध नॉर्थ झोनकडून खेळताना एकाच डावात ३२० धावा केल्या होत्या. इशानने पहिल्या डावात केलेल्या २७० धावा ही दुलीप ट्रॉफीमधील कोणत्याही यष्टीरक्षक-फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे, हा विक्रमही याच सामन्यात नोंदवला गेला.

साऊथ झोनला फॉलो-ऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ईस्ट झोनची सुरुवात खराब झाली. वैभव सूर्यवंशी (८) आणि अभिमन्यू ईश्वरन (३) स्वस्तात बाद झाल्याने संघाची अवस्था २ बाद १३ अशी झाली होती. पण इशान किशनने पुन्हा एकदा संघाला सावरलं. त्याने तिसऱ्या विकेटसाठी शिकर मोहनसोबत (५२) १२६ धावांची शानदार भागीदारी केली. आपल्या ८० धावांच्या खेळीत इशानने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. इशानच्या या दमदार फलंदाजीमुळे ईस्ट झोनने ५८४ धावांची मोठी आघाडी घेतली आहे आणि सामना संपायला फक्त एक दिवस शिल्लक असल्याने त्यांचे दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद जवळपास निश्चित झाले आहे.