PBKS vs GT: IPL 2026 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने पहिल्यांदा बॅटिंग करत पंजाब किंग्ससमोर 163 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. आता पंजाबची टीम हे आव्हान पूर्ण करणार की गुजरात बाजी मारणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आयपीएल 2026 चा थरार आता चांगलाच वाढला आहे. स्पर्धेतल्या चौथ्या सामन्यात आज पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या मॅचमध्ये पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने पहिल्यांदा बॅटिंग करत पंजाबसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही टीममध्ये काही नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. गुजरातने दोन, तर पंजाबने एका खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे.

गुजरात टायटन्सकडून दोन खेळाडूंचं पदार्पण

गुजरात टायटन्सने या मॅचमध्ये दोन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. टीममध्ये ग्लेन फिलिप्स आणि अशोक शर्मा यांचं पदार्पण झालं आहे. हे दोन्ही खेळाडू आपल्या कामगिरीने सामन्यात महत्त्वाचा फरक निर्माण करतील, अशी टीमला आशा आहे. विशेषतः ग्लेन फिलिप्स त्याच्या आक्रमक बॅटिंग आणि फिल्डिंगसाठी ओळखला जातो.

पंजाब किंग्सकडून कूपर कॉनलीला संधी

दुसरीकडे, पंजाब किंग्सने या मॅचमध्ये कूपर कॉनलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केलं आहे. तो टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी टीम मॅनेजमेंटला अपेक्षा आहे. पंजाबची टीम या सामन्यात अनुभवी आणि तरुण खेळाडूंच्या चांगल्या मिश्रणामुळे संतुलित दिसत आहे.

मागच्या सीजनमध्ये पंजाब पडला होता भारी

मागच्या सीजनमध्ये पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात फक्त एकच सामना झाला होता, जो खूपच रोमांचक ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या त्या मॅचमध्ये पंजाब किंग्सने पहिल्यांदा बॅटिंग करत 243 धावांचा डोंगर उभारला होता. त्या सामन्यात कॅप्टन श्रेयस अय्यरने नाबाद 97 धावांची शानदार खेळी केली होती. याच्या उत्तरात गुजरातची टीम पूर्ण प्रयत्न करूनही 232 धावांपर्यंतच पोहोचू शकली आणि पंजाबने 11 धावांनी मॅच जिंकली होती.

यावेळी गुजरात हिशोब चुकता करणार का?

मागच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी गुजरात टायटन्सची टीम या सामन्यात अधिक आक्रमक दिसू शकते. कॅप्टन शुभमन गिलसमोर पंजाबच्या घरच्या मैदानावर जिंकण्याचं मोठं आव्हान असेल. तर दुसरीकडे, पंजाब किंग्सलाही हा सामना जिंकून स्पर्धेत विजयी सुरुवात करायची आहे.

गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन

साई सुदर्शन, शुभमन गिल, जॉस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कागिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज.

पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन

प्रभसिमरन सिंग, कूपर कॉनली, श्रेयस अय्यर, नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोयनिस, मार्को यानसन, झेवियर बार्टलेट, विजय कुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.