आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चौथा टी-२० सामना रंगणार आहे. आजचा सामना जिंकणं टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण...
भारताने आजचा सामना जिंकल्यास टी-२० मालिका त्यांच्या नावावर होईल. यासोबतच टीम इंडियाचे हेडमास्तर गौतम गंभीर यांच्यासाठी हा दिवस खूप खास ठरेल. कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे टीम इंडियाला त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असेल, तर आजचा सामना जिंकावाच लागेल.
गौतम गंभीर म्हटलं की त्यांचा राग, आक्रमकपणा आणि गंभीर चेहरा आपल्या डोळ्यांसमोर येतो. याच कारणामुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. पण त्यांनी कधीच स्वतःच्या करिअरशी तडजोड केली नाही. गंभीरने नेहमीच आपल्यावर दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे.

गौतम गंभीरचा जन्म १४ ऑक्टोबर १९८१ रोजी दिल्लीत झाला. त्यांनी २००३ ते २०१६ या काळात टीम इंडियासाठी एकूण २४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. सध्या ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.
गंभीरचे तीन मोठे रेकॉर्ड्स
गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी हे सहाही सामने जिंकून दिले आहेत. म्हणजेच कर्णधार म्हणून त्यांचा विजयाचा रेकॉर्ड १०० टक्के आहे. गंभीर व्यतिरिक्त फक्त अनिल कुंबळे आणि अजिंक्य रहाणे यांनीच अशी कामगिरी केली आहे.
सलग पाच शतकं
गंभीरने दोन प्रमुख विश्वचषकांमध्ये मॅच विनिंग खेळी केली आहे. सलग पाच सामन्यांमध्ये पाच शतकं ठोकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. २००९ ते २०१० या काळात गंभीरने ही कामगिरी केली होती. सर डॉन ब्रॅडमन यांनी सहा सामन्यांमध्ये सलग सहा शतकं झळकावली आहेत.

सलग ११ अर्धशतकं
त्यांचा आणखी एक मोठा रेकॉर्ड म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सलग ११ अर्धशतकं झळकावण्याची कामगिरी. सलग सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या ऐतिहासिक विक्रमात गौतम गंभीरचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. २००७ आणि २०११ च्या विश्वचषकात गंभीरचं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी २००७ च्या विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध ७५ धावा केल्या होत्या. तर २०११ च्या विश्वचषक फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध ९७ धावांची खेळी केली होती.
गंभीरने ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४१५४ धावा केल्या आहेत. तसेच १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२३८ धावा आणि ३७ टी-२० सामन्यांमध्ये ९३२ धावा केल्या आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून गंभीर आणखी मोठी कामगिरी करतील अशी आशा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
