१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध ९ सिक्स मारत धमाकेदार खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. त्याने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.
लंडन : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणारा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी तुम्हाला आठवत असेलच, ज्याने ३५ चेंडूत शतक ठोकून मोठमोठ्या खेळाडूंना दाखवून दिले होते की हा १४ वर्षांचा मुलगा काय करू शकतो? आता त्याच वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या भूमीवर जाऊन भारताचा झेंडा फडकवला आणि नवा विक्रम रचला. होय, अंडर-१९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीने धमाकेदार खेळी केली आणि एक-दोन नव्हे तर तब्बल ९ सिक्स मारून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला.
भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-१९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना
भारत आणि इंग्लंडमध्ये अंडर-१९ एकदिवसीय मालिका सुरु आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसऱ्या युथ सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी करत भारताला ३४.४ षटकांत ६ गडी बाद २७४ धावा करण्यास मोठी मदत केली. आपल्या धमाकेदार खेळीत त्याने ९ सिक्स मारत ८६ धावा केल्या. तर, पहिल्या सामन्यात त्याने ४८ धावा आणि दुसऱ्या सामन्यात ४५ धावा केल्या. आता तिसऱ्या सामन्यात त्याने ३१ चेंडूत ८६ धावांची खेळी केली, यासोबतच त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
युथ अंडर-१९ एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. खरंतर, अंडर-१९ युथ एकदिवसीय सामन्याच्या एका डावात तो सर्वाधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने राज बावा आणि मनदीप सिंग यांनाही मागे टाकले आहे. राज बावाने युगांडाविरुद्ध २०२२ मध्ये आठ सिक्स मारले होते, तर मनदीप सिंगने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर-१९ संघाविरुद्ध एका सामन्यात ८ सिक्स मारले होते.
आयपीएलमध्येही झळकला वैभव सूर्यवंशी
१४ वर्षीय भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते. गुजरात टायटन्सविरुद्ध एका सामन्यात त्याने ३५ चेंडूत शतक ठोकले होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला होता. त्याने आयपीएलच्या या हंगामातील एकूण ७ सामन्यांत २५२ धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना यावर्षी आपल्या संघात सामील केले होते, तो बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी आहे आणि आता संपूर्ण जगात आपले नाव उज्ज्वल करत आहे.
मराठमोळ्या Vaibhav Suryavanshi ने घेतली होती PM Modi यांची भेट, पाया पडून घेतले होते आशिर्वाद
आयपीएल २०२५ (IPL 2025) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा १४ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने आपल्या जबरदस्त फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थानचा संघ जरी अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही, तरी वैभवचा गुजरात टायटन्सविरुद्धचा ३५ चेंडूंमध्ये झळकवलेले शतक हे हंगामातील सर्वात गाजलेला क्षण ठरला होता.
वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या आईवडिलांना पाटणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली होती. या भेटीत वैभवने पंतप्रधान मोदींच्या पायांवर डोके टेकून आदर व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये लिहिले होते की, "पाटणा विमानतळावर भारताचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्याच्या क्रिकेट कौशल्याचे संपूर्ण देशभर कौतुक होत आहे! त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!" यासोबत त्यांनी वैभव आणि त्याच्या पालकांसोबतचे काही फोटो देखील पोस्ट केले.