Ind vs Pak Asia Cup 2025 पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने हे घडले. संघाचे सदस्य आणि सपोर्ट स्टाफ हीच खरी ट्रॉफी आहे, असे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला.

Ind vs Pak Asia Cup 2025 : आशिया कपचे विजेतेपद पटकावल्यानंतरही समारंभात भारताला ट्रॉफी देण्यात आली नाही, असा खुलासा कर्णधार सूर्यकुमार यादवने केला आहे. चॅम्पियन संघाला ट्रॉफी न देण्याचा हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिलाच अनुभव असल्याचे भारतीय कर्णधाराने म्हटले. भारतीय संघ ट्रॉफीसाठी पात्र होता. त्याचवेळी, संघाचे सदस्य आणि सपोर्ट स्टाफ हीच खरी ट्रॉफी आहे, असे सूर्यकुमार यादव म्हणाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास भारताने नकार दिला होता. दुसऱ्या कोणाच्या तरी हस्ते ट्रॉफी देण्यात यावी, ही टीम इंडियाची मागणी मान्य झाली नाही, असे वृत्त समोर येत आहे. मॅच फी भारतीय लष्कराला देणार असल्याचे सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला...

"मी इतके दिवस क्रिकेट खेळतोय, पण असे काही मी आजपर्यंत पाहिले नाही. चॅम्पियन संघाला ट्रॉफी नाकारण्यात आली, जी त्यांनी मेहनतीने जिंकली होती. ते सोपे नव्हते. आम्ही सलग दोन दिवस दोन मजबूत संघांविरुद्ध सामने खेळलो. आम्ही त्यासाठी पात्र होतो. मला याबद्दल अधिक काही बोलायचे नाही. खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफ हीच खरी ट्रॉफी आहे. या संपूर्ण आशिया कप प्रवासात मी त्यांचा चाहता आहे. याच खऱ्या आठवणी मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. त्या माझ्यासोबत कायम राहतील," असे सूर्यकुमार यादव म्हणाला.

गोंधळामुळे ट्रॉफी प्रदान सोहळा सुरू होण्यास एक तास उशीर झाला. सोहळा सुरू झाल्यावर भारतीय संघ पदके स्वीकारण्यासाठी किंवा ट्रॉफी घेण्यासाठी मंचावर आला नाही. मोहसिन नक्वी ट्रॉफी देणार असतील, तर भारतीय संघ ती स्वीकारणार नाही, असे वृत्त आधीच समोर आले होते. बक्षीस वितरण समारंभाला जाण्यापूर्वी, भारतीय संघ व्यवस्थापनाने आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अधिकाऱ्यांकडे विजेत्यांना ट्रॉफी कोण देणार आहे, अशी विचारणा केल्याचे समजते.

जेव्हा नक्वी मंचावर आले, तेव्हा एसीसीने त्यांना भारतीय संघाच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. दरम्यान, आयोजन समितीतील कोणीतरी ट्रॉफी मैदानावरून काढून टाकली. भारतीय संघाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झरूनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु नक्वी यांनी ती मागणी फेटाळल्याचे वृत्त आहे. त्यानंतर भारतीय संघ मंचावर आला आणि डुप्लिकेट ट्रॉफीसह विजय साजरा केला. आपण खेळलेल्या सर्व सामन्यांची मॅच फी भारतीय लष्कराला समर्पित करणार असल्याचे भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले.

भारताची विजयगाथा

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. तिलक वर्माचे (६९) शानदार अर्धशतक आणि कुलदीप यादवच्या चार विकेट्सच्या कामगिरीने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ १९.१ षटकांत १४६ धावांवर सर्वबाद झाला. चार बळी घेणाऱ्या कुलदीप यादवने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. ३८ चेंडूत ५७ धावा करणारा साहिबजादा फरहान पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. फखर जमानने ३५ चेंडूत ४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९.४ षटकांत केवळ पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. तिलक वर्माच्या (५३ चेंडूत ६९) झुंजार खेळीने भारताला आशिया कप जिंकून दिला. शिवम दुबेची (२२ चेंडूत ३३) कामगिरी निर्णायक ठरली. संजू सॅमसन २१ चेंडूत २४ धावा करून परतला.

शेवटच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती. पाकचा वेगवान गोलंदाज फहीम अश्रफच्या पहिल्या चेंडूवर तिलकने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर दुबेनेही एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवरही एक धाव. चौथा चेंडू दुबेने सीमारेषेपार पाठवला, चौकार. पाचव्या चेंडूवर धाव नाही. शेवटच्या चेंडूवर दुबे बाद झाला. लाँग ऑफवर शाहीन आफ्रिदीने त्याचा झेल घेतला. दुबेच्या खेळीत प्रत्येकी दोन षटकार आणि चौकारांचा समावेश होता. त्यानंतर रिंकू सिंग क्रीजवर आला. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १० धावांची गरज होती. हॅरिस रौफच्या पहिल्या चेंडूवर तिलकने दोन धावा घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर षटकार. त्यानंतर विजयासाठी चार चेंडूत फक्त दोन धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर एक धाव. चौथ्या चेंडूचा सामना करताना रिंकू सिंगने चौकार मारून विजय साजरा केला. रिंकू सिंग (४) तिलकसोबत नाबाद राहिला.

तत्पूर्वी, भारताची सुरुवात खराब झाली होती. २० धावांत तीन गडी गमावले. दुसऱ्याच षटकात भारताने धोकादायक अभिषेक शर्माची (५) विकेट गमावली. फहीमच्या चेंडूवर मिड-ऑनवर हॅरिस रौफकडे झेल देऊन अभिषेक परतला. तिसऱ्या षटकात सूर्यकुमारही परतला. आफ्रिदीच्या चेंडूवर मिड-ऑफवर कर्णधार सलमान आगाने त्याचा झेल घेतला. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गिलही परतला. यावेळी मिड-ऑनवर हॅरिस रौफने त्याचा झेल घेतला. यामुळे भारताची अवस्था ३ बाद २० अशी झाली. त्यानंतर संजू-तिलक जोडीने ५७ धावांची भर घातली. या भागीदारीने संघाला कोसळण्यापासून वाचवले. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात संजूने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. अबरार अहमदविरुद्ध असाच एक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला. फरहानकडे झेल देऊन संजू परतला. संजूच्या खेळीत एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. यामुळे १२.२ षटकांत भारताची अवस्था ४ बाद ७७ अशी झाली. त्यानंतर दुबे क्रीजवर आल्याने खेळाचे चित्रच पालटले. त्याने वेगाने धावा काढत तिलकसोबत भारताला विजयाकडे नेले.