भारतीय क्रिकेट टीमची क्रेझ फक्त विराट कोहली किंवा रोहित शर्मापुरती उरलेली नाही. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांसारखे नवे खेळाडूही जगभरात तुफान लोकप्रिय होत आहेत. टीम इंडियाचा दौरा म्हणजे यजमान देशांसाठी पैशांचा पाऊस ठरू लागलाय.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीम जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जाते, तेव्हा तिथल्या स्टेडियमवर चाहत्यांची तुफान गर्दी दिसते. मॅचची तिकीटं हातोहात विकली जातात, टीव्ही ब्रॉडकास्टिंग राइट्सचे भाव गगनाला भिडतात आणि स्पॉन्सर्सची रांग लागते. म्हणूनच, भारतीय टीमचा दौरा हा यजमान देशांसाठी फक्त एक क्रिकेट मालिका उरत नाही, तर कमाईची मोठी संधी बनतो.
फक्त कोहली-रोहित नाही, नव्या खेळाडूंचीही तुफान क्रेझ!
न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेली भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका याचं उत्तम उदाहरण आहे. 'भारतीय टीम जिथे जाते, तिथे चाहते त्यांच्या मागे धावतात,' असं मत न्यूझीलंडचा फलंदाज फिन ॲलनने व्यक्त केलं आहे. या मालिकेतील पहिल्या तीन टी-२० मॅचेसला झालेली तुफान गर्दी भारतीय टीमची हीच ताकद दाखवून देते.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटचे सर्वात मोठे ब्रँड आहेत, यात वादच नाही. पण आता टीम इंडियाचं आकर्षण फक्त या दोघांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन यांसारखे तरुण खेळाडूही जगभरात तुफान प्रसिद्धी मिळवत आहेत. परदेशात राहणारे भारतीय आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी स्टेडियमवर गर्दी करतात. इतकंच नाही तर तिथले स्थानिक चाहतेही भारतीय टीमची मॅच पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात.
परदेशी बोर्ड भारतीय टीमच्या दौऱ्याची वाट का पाहतात?
टीम इंडियाच्या दौऱ्यामुळे फक्त तिकीट विक्रीतूनच पैसे मिळत नाहीत, तर ब्रॉडकास्टिंग राइट्स, जाहिराती आणि स्पॉन्सरशिपमधून परदेशी क्रिकेट बोर्डांची मोठी कमाई होते. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट म्हटलं होतं की, 'आम्हाला भारतीय टीमचे जास्तीत जास्त सामने होस्ट करायचे आहेत.'
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनीही काही काळापूर्वी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, 'भारताकडे मोठी आर्थिक ताकद आहे. भारतासोबत खेळल्यामुळे आयसीसीच्या इतर सदस्य देशांना कमाईची मोठी संधी मिळते.'
वेस्ट इंडिज क्रिकेटला भारताचा किती फायदा?
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे माजी सीईओ जॉनी ग्रेव्ह यांच्या विधानावरून भारताच्या आर्थिक प्रभावाचा अंदाज येतो. त्यांच्या मते, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या एकूण कमाईपैकी तब्बल ७५ टक्के हिस्सा हा भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीव्ही मार्केटशी संबंधित आहे. यामध्ये भारतीय टीमच्या द्विपक्षीय मालिकांमधून मिळणाऱ्या महसुलाचा मोठा वाटा आहे.
मैदानाबाहेरही टीम इंडियाचा डंका!
थोडक्यात सांगायचं तर, भारतीय क्रिकेटची ताकद ही फक्त खेळाडूंच्या कामगिरीपुरती मर्यादित राहिलेली नाही. अफाट चाहता वर्ग, जगभरात पसरलेला भारतीय समुदाय, मोठा टीव्ही प्रेक्षकवर्ग आणि व्यावसायिक संधींमुळे भारतीय क्रिकेटला जगात एक खास स्थान मिळालं आहे. म्हणूनच जगातलं कोणतंही क्रिकेट बोर्ड असो, ते भारतीय टीमच्या दौऱ्याची वाट पाहत असतं. भारत खेळतो तेव्हा स्टेडियम भरतं आणि स्टेडियम भरलं की क्रिकेटचा व्यवसाय जोरात चालतो!






