आयपीएल २०२७ च्या नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. लसिथ मलिंगाच्या जागी मिचेल मॅकक्लेनाघन, तर रॉबिन उथप्पा आणि टी दिलीप यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा फेरबदल केला आहे. फ्रँचायझीने आज नवीन बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कोचिंग स्टाफची अधिकृत घोषणा केली. पदमुक्त झालेल्या लसिथ मलिंगाच्या जागी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि मुंबईचा माजी खेळाडू मिचेल मॅकक्लेनाघन आता संघाचा नवा बॉलिंग कोच असेल.
मुंबई इंडियन्सने बॅटिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांच्या जागी भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाची निवड केली आहे. फिल्डिंग कोच कार्ल हॉपकिन्सनच्या जागी भारतीय क्रिकेट टीमचे माजी फिल्डिंग कोच टी दिलीप यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. यासोबतच मुंबईचा माजी गोलंदाज धवल कुलकर्णी याची डेव्हलपमेंट बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. मुख्य प्रशिक्षकपदी माहेला जयवर्धनेच्या जागी किरॉन पोलार्डची निवड झाल्यानंतर काही दिवसांतच हे मोठे बदल समोर आले आहेत.
मुंबई इंडियन्सने कालच श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगासोबतचा प्रदीर्घ प्रवास संपल्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला खेळाडू आणि नंतर सपोर्ट स्टाफ म्हणून मलिंगाने संघासाठी मोठे योगदान दिले. मुंबईच्या चार आयपीएल ट्रॉफी आणि २०११ च्या चॅम्पियन्स लीग टी-२० विजयात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील तो एक सर्वात प्रभावशाली खेळाडू राहिला आहे.
माजी बॅटिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांचाही मुंबई इंडियन्ससोबत जुना संबंध आहे. २०१० ते २०१७ दरम्यान ते फ्रँचायझीचे मुख्य भाग होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय संघाचे बॉलिंग कोच पद सोडल्यानंतर ते पुन्हा मुंबई इंडियन्सच्या गोटात दाखल झाले होते.





