भारतीय क्रिकेट टीमचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर होत असलेल्या टीकेला माजी खेळाडू हरभजन सिंगने उत्तर दिलं आहे. गंभीरचा स्पष्टवक्तेपणा हा त्याचा अहंकार म्हणून पाहिला जातो, पण तो संघाच्या विजयासाठी मनापासून काम करणारा व्यक्ती आहे, असं हरभजनने म्हटलं आहे.
दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर होत असलेल्या टीकेला माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंगने सडेतोड उत्तर दिलं आहे. गंभीरचा मोकळा स्वभाव आणि धाडसी भूमिका अनेकदा अहंकार म्हणून चुकीच्या पद्धतीने पाहिल्या जातात. पण तो नेहमीप्रमाणेच आपली मतं स्पष्टपणे मांडणारा व्यक्ती आहे, असं हरभजनने स्पष्ट केलं. गौतम गंभीर एक चांगला माणूस आहे, पण तो जे 'कडू सत्य' बोलतो, ते पचवणं अनेकांना जमत नाही, असंही हरभजन म्हणाला.
टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय टीमला लागोपाठ अपयश आल्याने गंभीरवरची टीका वाढली होती. ऑस्ट्रेलियात पराभव स्वीकारल्यानंतर भारताला मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही मालिका गमवावी लागली. याच पार्श्वभूमीवर गंभीरवर टीका होऊ लागली. पण टीम खराब कामगिरी करते तेव्हा प्रत्येक वेळी फक्त कोचलाच का दोष दिला जातो, असा सवाल हरभजनने केला आहे. ''गौतमवर इतकी टीका का होते? टीम चांगलं खेळत नसताना लोक नेहमी कोचलाच का दोष देतात, हे मला अजूनही समजलेलं नाही,'' असं हरभजन म्हणाला.
मैदानावरचा गंभीरचा आक्रमकपणा हाच त्याचा खरा स्वभाव नाही, याची आठवण हरभजनने करून दिली. तो म्हणाला की, जेव्हा गंभीर एक तरुण खेळाडू म्हणून टीममध्ये आला होता, तेव्हापासून मी त्याला जवळून ओळखतो. ''पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून त्याची पारख करू नका. तो एक खूप चांगला माणूस आहे. खेळ कसा खेळायला हवा, याबद्दल त्याच्याकडे स्पष्ट कल्पना आहे,'' असं हरभजनने सांगितलं. भारतीय कोच म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर गंभीरला टीममध्ये फक्त एकच तत्व रुजवायचं आहे आणि ते म्हणजे 'विजयासाठी खेळा', असंही हरभजन म्हणाला.
मॅच ड्रॉ करण्यासाठी झगडण्यापेक्षा, विजयासाठी प्रयत्न करून हरणं गंभीरला जास्त पसंत आहे, असंही त्याने जोडलं. येणाऱ्या काळातले मॅचचे निकालच गंभीरची कोचिंग कारकीर्द कशी असेल हे ठरवतील, पण त्याच्या कठोर भूमिकेमागे टीमबद्दलची प्रामाणिकपणा आणि विजयाची तळमळ आहे, हे हरभजनने स्पष्ट केलं.