सूर्यांशने अवघ्या ७ षटकांत ४० धावा देऊन ४ बळी घेतले. त्याने विल सदरलँड (७७), निखिल चौधरी, टॉड मर्फी आणि स्पेन्सर जॉन्सन यांना बाद करत ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे मोडले.

पुद्दुचेरी : ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात भारत 'अ' संघासमोर २७५ धावांचं आव्हान आहे. पुद्दुचेरीच्या सीचेम क्रिकेट स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी संघात आलेल्या मुंबईच्या सूर्यांश शेडगेने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याच्या ४ बळींमुळे भारताला ऑस्ट्रेलियाला २७४ धावांवर रोखता आलं.

सूर्यांशने ७ षटकांत फक्त ४० धावा देत ४ विकेट्स काढल्या. त्याने विल सदरलँड (७७), निखिल चौधरी, टॉड मर्फी आणि स्पेन्सर जॉन्सन यांची शिकार केली. पाहुण्या संघाकडून नॅथन मॅकस्वीनीने १२३ धावांची शतकी खेळी करत संघाला सावरलं. कर्णधार विल सदरलँडने ७७ धावा केल्या, पण इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. नॅथन मॅकस्वीनी आणि सदरलँड यांनी १४१ धावांची भक्कम भागीदारी करत ऑस्ट्रेलियन डावाला आकार दिला. मॅकस्वीनीने १३५ चेंडूत १२३ धावा कुटल्या.

एका क्षणी ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ८७ अशी बिकट झाली होती. पण त्यानंतरच्या भागीदारीने त्यांना २७० चा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून सूर्यांश व्यतिरिक्त यश ठाकूरने ३, अर्शद खानने २ तर निशांत सिंधूने १ गडी बाद केला.

२७५ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारत 'अ' संघाने १७ षटकांत ४ बाद ७७ धावा केल्या होत्या. रजत पाटीदार २६ तर निशांत सिंधू १४ धावांवर खेळत होते. साई सुदर्शन (१), प्रभसिमरन सिंग (१७), देवदत्त पडिक्कल (०) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड (१५) स्वस्तात माघारी परतले आहेत.