IPL 2026 Gujarat vs Delhi: आयपीएलच्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी २११ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने २० ओव्हर्समध्ये २१० धावा केल्या.

दिल्ली: आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर २११ धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना गुजरातने कॅप्टन शुभमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावून २१० धावा केल्या. गिलने ४५ चेंडूत सर्वाधिक ७० धावा केल्या. तर बटलरने २۷ चेंडूत ५२ आणि सुंदरने ३२ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन विकेट्स घेतल्या.

टॉस हरून बॅटिंगसाठी उतरलेल्या गुजरातची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेला साई सुदर्शन स्वस्तात परतला. ७ चेंडूत १२ धावा करून तो मुकेश कुमारच्या बॉलवर त्रिफळा उडाला. पण त्यानंतर आलेल्या जोस बटलरने दिल्लीच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. बटलरच्या फटकेबाजीमुळे गुजरातने पॉवर-प्लेमध्ये ६७ धावांपर्यंत मजल मारली. पॉवर-प्लेनंतर, ५ फोर आणि ३ सिक्स मारून ५२ धावांवर खेळणाऱ्या बटलरला कुलदीप यादवने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण चौथ्या नंबरवर आलेल्या सुंदरने गिलसोबत मिळून शतकी भागीदारी रचली आणि गुजरातला मोठ्या स्कोरकडे नेलं. दोघांनी मिळून फक्त ६० चेंडूत १०४ धावा ठोकल्या.

गुजरातला १८व्या ओव्हरमध्ये गिलच्या रुपात मोठा धक्का बसला. ४ फोर आणि ५ सिक्सच्या मदतीने ४५ चेंडूत ७० धावा करून तो आऊट झाला. त्यानंतर आयपीएलमधील आपलं पहिलं अर्धशतक पूर्ण करून सुंदरही माघारी परतला. शेवटी, ग्लेन फिलिप्सने ९ चेंडूत नाबाद १४ धावा करत गुजरातचा स्कोर २१० पर्यंत पोहोचवला. दिल्लीकडून मुकेश कुमारने ५५ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.