Ajit Agarkar Chief Selector : भारतीय क्रिकेटमधील वादग्रस्त वर्षानंतर अजित आगरकर यांचा निवड समिती अध्यक्षपदाचा काळ संपत आला आहे. पण आगरकर खरंच एक वाईट सिलेक्टर होते का? त्यांच्या निर्णयांचा हा आढावा

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कसोटीमधून निवृत्ती, संजू सॅमसनच्या कामगिरीकडे केलेलं दुर्लक्ष, शुभमन गिलला टी-20 संघातून बाहेरचा रस्ता, तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचं अनेक फॉरमॅटमधून गायब होणं... असे अनेक वादग्रस्त निर्णय अजित आगरकर यांच्या काळात घेण्यात आले. भारतीय क्रिकेटमधील हा वादळाचा काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. 

खरं तर, मुख्य निवडकर्ता म्हणून आगरकर यांचा कार्यकाळ गेल्या जूनमध्येच संपला होता. पण बीसीसीआयने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. असं वाटत होतं की २०२७ च्या एकदिवसीय वर्ल्डकपपर्यंत आगरकर आपलं पद टिकवून ठेवतील, पण लॉर्ड्सवर सगळं चित्रच पालटलं. याचं कारण ठरला रोहित शर्मा. निवड समितीने रोहितला २०२७ च्या वर्ल्डकप योजनेत नसल्याचं कळवलं होतं, अशा बातम्या समोर आल्या. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा लॉर्ड्सवरचा एकदिवसीय सामना रोहितचा शेवटचा सामना ठरू शकतो, अशीही चर्चा सुरू झाली.

पण हा निर्णय बीसीसीआयच्या संमतीने घेतला होता की नाही, हे स्पष्ट नाही. कारण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहितच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर झालेल्या सामन्यात रोहितने शतक झळकावूनच या चर्चांना उत्तर दिलं. विशेष म्हणजे, वयाच्या ३९ व्या वर्षी लॉर्ड्सवर एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. या खेळीने रोहितने आपल्या जागेबद्दल आणि फॉर्मबद्दलच्या सर्व शंका दूर केल्या.

आगरकर यांच्यासमोर फक्त हे एकच आव्हान नाही. टी-20 फॉरमॅटमध्ये आयर्लंड आणि इंग्लंडकडून सलग दोन मालिका गमावल्या. एकही सामना न जिंकता टीमला पराभव पत्करावा लागला. याशिवाय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही टीमची कामगिरी निराशाजनक आहे. ९ सामन्यांपैकी ४ विजय आणि ४ पराभवांसह भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश भारताच्या पुढे आहेत. पुढच्या आठवड्यात सुरू होणारी श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका भारत आणि आगरकर या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे.

आगरकर एक चांगले निवडकर्ता होते का? 

ऑक्टोबर २०२३ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर भारताने त्यांच्या काळात चार महत्त्वाच्या आयसीसी व्हाईट-बॉल स्पर्धा खेळल्या - २०२३ एकदिवसीय विश्वचषक, २०२४ टी-20 विश्वचषक, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ टी-20 विश्वचषक. 

२०२३ च्या विश्वचषकात भारत फायनलमध्ये पोहोचला, तर इतर तीन स्पर्धांमध्ये भारताने विजेतेपद पटकावलं. या काळात भारताच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मोठे बदल झाले आणि तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ तयार करण्यात आले.

गेल्या काही काळातील भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे निर्णय आगरकर यांच्याच काळात झाले. पहिला म्हणजे रोहित-विराटची कसोटी निवृत्ती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील खराब कामगिरीनंतर दोघांनाही कसोटी क्रिकेटला अलविदा करावा लागला. भारतीय क्रिकेटच्या या दिग्गजांना असा निर्णय घेण्यास भाग पाडणं सोपं नव्हतं. पण हा निर्णय भविष्याचा विचार करून घेतला गेला होता आणि इंग्लंड दौऱ्याने तो चुकीचा नव्हता हे सिद्ध केलं. आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या निर्णयाची खरी कसोटी लागणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिल्यानंतरही रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. हा निर्णय २०२७ च्या एकदिवसीय वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून घेतला गेला. भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर वर्ल्डकपच्या दोन वर्षे आधी कर्णधार बदलण्याची परंपरा आहे, पण रोहित त्यावेळी संघाला चांगल्या प्रकारे सांभाळत होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताचा सुवर्णकाळ सुरू होता.

तिसरा मोठा निर्णय टी-20 फॉरमॅटमध्ये झाला. एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार असूनही शुभमन गिलला टी-20 वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं आणि त्याच्या जागी संजू सॅमसन व इशान किशनला संधी दिली. या धाडसी निर्णयामुळे भारताने वर्ल्डकप जिंकला. संजू वर्ल्डकपचा 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला, तर इशान भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. पण वर्ल्डकप नंतर केलेले प्रयोग, विशेषतः गोलंदाजीत, पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत.

गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, शमी आणि सिराजला कसं विसरता येईल? शमीला तिन्ही फॉरमॅटमधून बाहेर ठेवण्यात आलं, तर सिराज फक्त कसोटीपुरता मर्यादित राहिला. २०२७ च्या वर्ल्डकपसाठी गोलंदाजीमध्ये मोठे बदल केले जात आहेत, पण शमी आणि सिराजसारखी गुणवत्ता नवीन गोलंदाजांमध्ये आहे का, हा प्रश्न आहे. चांगली कामगिरी करूनही या दोघांना बाहेर बसावं लागत आहे. आगरकरांनी अनेक असे निर्णय घेतले जे चाहत्यांना आवडले नाहीत, पण त्यामागे स्टारडमपेक्षा भविष्याचा विचार अधिक होता.

त्यांच्या अनेक निर्णयांनी भारताला विजेतेपदं मिळवून दिली. पण रोहित-कोहली प्रकरण हाताळणं आगरकरांसाठी सोपं नसेल. आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांपेक्षा हे प्रकरण खूप वेगळं आहे, विशेषतः जेव्हा हे दोन्ही खेळाडू फक्त एकच फॉरमॅट खेळत आहेत. यावर तोडगा काढणंच बीसीसीआयसमोरचं मोठं आव्हान आहे. सोबतच, वर्ल्डकप जिंकूनही संजूला संघाबाहेर जावं लागल्याची परिस्थितीही आहेच.