ऋषभ पंतने ७ ऑगस्ट २०२४ रोजी भारतासाठी शेवटचा वनडे सामना खेळला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने आपली जागा पक्की केली असली, तरी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला म्हणावी तशी चमक दाखवता आलेली नाही.
मुंबई: विकेटकीपर-बॅटर ऋषभ पंतने भारतीय वनडे टीममधून सातत्याने डावललं जात असल्याबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीममधून वगळल्यानंतर त्याने 'बिझनेस ऑफ स्पोर्ट्स' पॉडकास्टवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. टीमबाहेर बसावं लागल्यावर वाईट वाटणं साहजिक आहे, पण एक खेळाडू म्हणून कमबॅक करणं नक्कीच शक्य असतं, असं पंत म्हणाला.
पंतने भारतासाठी आपला शेवटचा वनडे सामना ७ ऑगस्ट २०२४ रोजी खेळला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली असली, तरी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही. ३१ वनडे सामन्यांमध्ये ३३.५० च्या सरासरीने त्याने फक्त ८७१ रन्स केले आहेत. २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद १२५ रन्सची खेळी हे त्याचं वनडेतलं एकमेव शतक आहे.
"जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा नक्कीच दुःख होतं. पण एका खेळाडूचं लक्ष नेहमी कमबॅक करण्यावरच असतं. चढ-उतार हा आयुष्याचा भाग आहे. बाहेरून मतं मांडणं खूप सोपं असतं, पण गोष्टी योग्य मार्गावर येण्यासाठी लोकांनी थोडी वाट पाहिली पाहिजे," असं पंतने स्पष्ट केलं.
कार अपघातामुळे पंतला जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहावं लागलं आणि याचा त्याला मोठा फटका बसला. याच काळात के. एल. राहुल भारताचा मुख्य विकेटकीपर-बॅटर बनला. इशान किशन आणि ध्रुव जुरेल यांनीही सिलेक्टर्सच्या यादीत वरचं स्थान मिळवल्यामुळे पंतसाठी वनडे टीमचे दरवाजे बंद झाले.


