भारतात दिवाळीसाठी आठवडाभराची सुट्टी देण्याच्या मागणीने वर्क कल्चर, महागडा प्रवास आणि मर्यादित पेड लीव्ह यावरून ऑनलाइन चर्चा सुरू केली आहे. कुटुंबासोबत सण साजरा करणे इतके कठीण का आहे, असा सवाल नोकरदार करत आहेत.
मुंबई : दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. या काळात कुटुंबं एकत्र येतात, आणि परंपरा साजऱ्या करतात. पण, मूळ गावापासून दूर राहणाऱ्या हजारो नोकरदारांसाठी आपल्या माणसांसोबत हा सण साजरा करणं नेहमीच सोपं नसतं.
X वर नुकत्याच एका पोस्टने भारतातील कॉर्पोरेट वर्क कल्चरबद्दल चर्चा पुन्हा सुरू केली आहे. एका युजरने विचारलं आहे की, पाश्चात्य देशांमधील ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीप्रमाणे भारतात दिवाळीची आठवडाभराची सुट्टी का दिली जाऊ शकत नाही?
ही सूचना अशा लोकांच्या मनाला भिडली आहे, ज्यांना वाटतं की महत्त्वाच्या सणांमध्ये कर्मचाऱ्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी अधिक सुट्टी मिळायला हवी. या चर्चेतील तीन महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
एका X युजरला भारतात दिवाळीची आठवडाभराची सुट्टी का हवी आहे?
एका X युजरने भारतीय कार्यालयांमध्ये दरवर्षी सात दिवसांची दिवाळीची सुट्टी द्यावी अशी सूचना केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली. युरोप आणि अमेरिकेचं उदाहरण देत या युजरने असा युक्तिवाद केला की कर्मचाऱ्यांना लगेच कामावर परत जाण्याची चिंता न करता सण साजरा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा.

मूळ गावापासून शेकडो किंवा हजारो किलोमीटर दूर काम करणाऱ्यांना येणाऱ्या अडचणी युजरने अधोरेखित केल्या. १०००-२००० किमी दूर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ट्रेनने घरी जाण्यासाठी ३० ते ४० तास लागू शकतात.
अनेक कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपेक्षा जास्त सुट्टी मिळवणं कठीण असतं, त्यामुळे दिवाळीसाठी घरी जाणं त्यांच्यासाठी अवघड होतं. विमान प्रवासही सगळ्यांनाच परवडणारा नसतो, कारण सणांच्या काळात एका बाजूच्या विमान प्रवासाचं तिकीट २०,००० ते ३०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतं.
सुट्ट्यांवर निर्बंध आणि प्रवासाचा खर्च यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पालकांसोबत सण कसे साजरे करता येतील, असा प्रश्न युजरने विचारला.
भारतातील वर्क कल्चर आणि सणांच्या मर्यादित सुट्ट्यांवर प्रश्नचिन्ह
दिवाळीच्या सुट्ट्या वाढवण्याच्या मागणीपलीकडे जाऊन, या पोस्टने भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचाऱ्यांवर असलेल्या दबावावरही प्रश्न उपस्थित केले.
युजरने असा युक्तिवाद केला की भारत जगभरात आपले सण आणि परंपरांचा प्रचार करतो, परंतु अनेक नोकरदार त्यांच्या कुटुंबासोबत या उत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी संघर्ष करतात.
महत्त्वाच्या सणांच्या वेळीही कर्मचाऱ्यांना ऑफिसचं टेन्शन असतं, अशा वर्क कल्चरवर या पोस्टमध्ये टीका करण्यात आली आहे. युजरच्या मते, सणांच्या काळात ऑफिसचं काम आणि डेडलाईन्सची चिंता करण्यापेक्षा कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवण्याची संधी मिळायला हवी.
चांगल्या करिअरसाठी मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या पण आपल्या कुटुंबाशी आणि गावाशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क-लाईफ बॅलन्स किती महत्त्वाचा आहे, हे या चर्चेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: कंपन्यांनी सणांच्या सुट्ट्या वाढवाव्यात का?
या सूचनेवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. अनेक युजर्सनी सणांना जास्त सुट्ट्या देण्याच्या कल्पनेला पाठिंबा दिला.
एका युजरने निदर्शनास आणून दिलं की जास्त सुट्ट्या फक्त पाश्चात्य देशांमध्येच मिळत नाहीत. एका इजिप्शियन क्लायंटसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना या युजरने सांगितलं की, तिथल्या कर्मचाऱ्यांना ईद आणि बकरीदसाठी आठवडाभराची सुट्टी मिळते.
अमेरिका आणि युरोपमधील क्लायंटसोबत आठ वर्षे काम केलेल्या आणखी एका युजरने सांगितलं की, भारतीय कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी फक्त एक-दोन दिवस सुट्टी मिळते हे ऐकून परदेशातील सहकाऱ्यांना आश्चर्य वाटतं. या युजरच्या मते, भारतातील सर्वात मोठ्या सणाला जास्त सुट्ट्या का मिळत नाहीत, असा प्रश्न काही परदेशी सहकाऱ्यांनीही विचारला होता.
सुट्ट्यांबाबत अधिक लवचिक धोरण असावं अशाही सूचना आल्या. एका युजरने सुचवलं की, कंपन्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवडाभराची सुट्टी द्यावी, जी ते त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक सणांनुसार वापरू शकतील.
तथापि, दिवाळीला आठवडाभराची सुट्टी हाच एकमेव पर्याय आहे, यावर सर्वजण सहमत नव्हते. काही जणांचा असा युक्तिवाद होता की, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सुट्ट्यांचे आधीच नियोजन करावे, त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात आणि सणांपूर्वी सुट्टी मंजूर करून घ्यावी.













