Ramesh Mhatre gets Bail : डोंबिवली डॉक्टर मारहाणप्रकरणी अटकेत असलेल्या रमेश म्हात्रेंची जेलमधून सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

डोंबिवली : डोंबिवलीमधील डॉक्टरांना मारहाणप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली होती. मात्र जेलमध्ये असलेल्या रमेश म्हात्रे यांना आता मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जवळपास २० दिवसांनंतर ते जेलबाहेर आले आहेत. जामीन मंजूर केल्यानंतर कल्याण येथील आधारवाडी जेलमधून त्यांची सुटका करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असला, तरी याप्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे आणि याप्रकरणातील इतर आरोपींनी महाराष्ट्राबाहेरच राहवं, असं कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे रमेश म्हात्रे आणि इतर आरोपी गोव्यातील अंजुना इथे राहणार आहेत. जेलबाहेर आल्यानंतर रमेश यांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आपण लवकरच परतणार असल्याचं सांगितलं.

नेमकं काय घडलेलं?

डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयात एका गरोदर महिला आली होती. तिच्या बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळली होती. त्यामुळे तातडीच्या उपचारांची गरज होती. मात्र रुग्णालयाने बाळाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचं सांगितलं. यामागे त्यांनी रुग्णालयातील नवजात बाळांचा विभाग पूर्ण भरलेला असल्याचं कारण देण्यात आलं होतं. त्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी रमेश म्हात्रे यांना कॉल केला.

रमेश म्हात्रे यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात कॉल केला. पण त्यांचा कॉल डॉक्टरांनी उचलला नाही. त्यामुळे संतप्त म्हात्रे यांनी काही लोकांसह रुग्णालयत गाठलं आणि डॉक्टरांशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली होती. या दरम्यान रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. तसंच संपूर्ण प्रकरणानंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता.

वैद्यकीय कारण देत रमेश म्हात्रे जामिनावर होते. मात्र नंतर कोर्टाने त्यांचा जामीन रद्द केला. उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. तसंच मुंबई न्यायालयाकडून रमेश म्हात्रेला पोलिसांना शरण यावं, अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले होते. अखेर रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.