सार

पीएम मोदी यांची कल्याणला सभा असल्याने रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनास ठाणे हद्दीत मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत काल अवजड वाहनांना थांबवण्यात आलं होतं.

 

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आजही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. विरारच्या खानिवडे टोल नाक्यापासून पालघरच्या मनोर हद्दीतील टेन नाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गुजरात आणि मुंबई या दोन्ही लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सुमारे पाच किमीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

तीन ते चार तास वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकले

आज वर्किंग डे असल्याने हलकी वाहनेही सकाळच्या सुमारास निघाली. त्यात काही वाहनांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी रस्त्याच्या विरुध्द दिशेने गाडी हाकण्यास सुरुवात केली. सध्या महामार्गावर काही सिमेंट कॉक्रिटीकरण कामही सुरु आहे. त्यामुळे महामार्गावर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तीन ते चार तास वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

मोदींच्या सभेमुळे अवजड वाहनांना मनाई

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणला सभा असल्याने रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनास ठाणे हद्दीत मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत काल अवजड वाहनांना थांबवण्यात आलं होतं. अवजड वाहनांनी रात्रीच्या सुमारास आपली वाहने काढणे अपेक्षित होतं. मात्र, सर्व वाहनांनी सकाळी वाहने काढायला सुरुवात केल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.