मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये सध्या मोठे बदल दिसून येत आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये विक्रेते आता वर्तमानपत्राऐवजी स्वच्छ बटर पेपर वापरताना, ग्लोव्हज आणि हेअरनेट घालून पदार्थ बनवताना दिसत आहेत.

मुंबई : मुंबईचं स्ट्रीट फूड म्हणजे खवय्यांची पंढरी. पण आता या स्ट्रीट फूडचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. एक व्हायरल व्हिडिओ सध्या याचीच साक्ष देत आहे आणि इंटरनेटवर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. वडापाव आता वर्तमानपत्राच्या कागदात नाही, तर स्वच्छ बटर पेपरमध्ये दिला जातोय. गाडीवरचे विक्रेते ग्लोव्हज आणि डोक्यावर हेअरनेट घालून पदार्थ बनवत आहेत. असे अनेक चांगले बदल आता मुंबईच्या गल्लोगल्ली दिसू लागले आहेत.

या बदलांमागे महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांची कडक भूमिका असल्याचे बोलले जात आहे. ५१ वर्षीय मुंढे यांनी अस्वच्छतेविरोधात उघडलेली मोहीम सर्वांच्याच नजरेत आली आहे. त्यांनी अनेक हॉटेल्सची तपासणी केली, विनापरवाना चालणाऱ्यांवर कारवाई केली, इतकंच नाही तर चार डॉमिनोज आणि एका पिझ्झा हटचे परवानेही निलंबित केले आहेत.

शिवू (@kshytrea) नावाच्या एका कंटेंट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात मुंबईतील खाऊ गल्ल्यांमध्ये झालेले हे बदल स्पष्टपणे दिसतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आता वडापाव गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर बंद झाला आहे. त्याजागी स्वच्छ बटर पेपर वापरला जात आहे, ज्यामुळे कागदावरची विषारी शाई पोटात जाण्याचा धोका टळला आहे.

व्हायरल व्हिडिओ -

View post on Instagram

व्हिडिओमध्ये आणखी एक बदल दिसतो, तो म्हणजे कृत्रिम रंगांचा वापर कमी झाला आहे. मंचुरियन आणि चटण्या आता त्यांच्या नैसर्गिक रंगात मिळत आहेत. तसेच, पदार्थ बनवणारे शेफ आणि विक्रेते ग्लोव्हज आणि हेअरनेट वापरताना दिसत आहेत.

स्वयंपाकाच्या भांड्यांच्या स्वच्छतेवरही लक्ष दिले जात आहे. व्हिडिओ बनवणाऱ्याने एका प्लेटला टिशू पेपरने पुसून दाखवले, ज्यावर कोणतीही धूळ दिसली नाही. यावरून भांडी किती स्वच्छ धुतली जात आहेत, हे दिसून येते.

हे बदल फक्त पदार्थांपुरते मर्यादित नाहीत. स्थानिक उत्पादनं जसे की ब्रेड आणि टोस्ट, तसेच रेस्टॉरंटमधील केचपच्या बाटल्यांवर आता एमआरपी, घटक आणि एक्सपायरी डेट यांसारखी माहिती स्पष्टपणे दिली जात आहे. या व्हिडिओला फक्त एकच कॅप्शन दिले आहे - "बदलाव".

हा बदल नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३.५ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि जवळपास २० लाख लाईक्स मिळाले आहेत. हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, "दरवर्षी शेकडो अधिकारी निवडले जातात... पण फक्त एकाने, फक्त एकाने आपले कर्तव्य बजावले आणि ऐतिहासिक बदल घडवले."

दुसऱ्या एकाने कमेंट केली, "एका अधिकाऱ्याने आपले काम केल्याने एवढा बदल झाला; विचार करा, जर संपूर्ण सरकारने फालतू गोष्टींवर वेळ वाया न घालवता आपले ४० टक्के काम जरी नीट केले तर काय होईल."

मुंबईची स्ट्रीट फूड संस्कृती जरी जुनी आणि पारंपरिक असली, तरी हा व्हायरल व्हिडिओ दाखवतो की आता काही गोष्टी बदलत आहेत. खवय्यांसाठी स्वच्छतेकडे दिलेले हे लक्ष आणि पदार्थांबद्दलची स्पष्ट माहिती, हा मुंबईच्या लाडक्या स्ट्रीट फूड संस्कृतीतील एक स्वागतार्ह आणि नवा अध्याय ठरू शकतो.