पश्चिम रेल्वेने 1 सप्टेंबरपासून लोकलच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल केले आहेत.याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेच्या संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेतील लोकल सेवांमध्ये बदल करण्यात आला आहे. चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या दोन लोकल गाड्या बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. गर्दी आणि लोकलच्या विलंबाचा प्रश्न कमी करण्यासाठी हा बदल सध्या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे.
दोन लोकल बोरिवलीला थांबणार नाहीत
संध्याकाळी 6.22 वाजता सुटणारी चर्चगेट-विरार एसी लोकल आणि 7.05 वाजताची चर्चगेट-विरार लोकल आता बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. मात्र, या दोन्ही लोकल दहिसर स्थानकावर थांबणार आहेत. बोरिवलीत मोठ्या प्रमाणात प्रवासी चढ-उतार करत असल्याने लोकलला अधिक वेळ थांबावे लागते आणि त्याचा परिणाम पुढील सेवांच्या वेळापत्रकावर होतो. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बोरिवलीच्या प्रवाशांसाठी पर्यायी AC लोकल
6.22 वाजताच्या AC लोकलने बोरिवलीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने पर्यायी व्यवस्था केली आहे. संध्याकाळी 6.28 वाजता चर्चगेटहून सुटणारी नवीन एसी लोकल बोरिवलीला थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांना AC लोकलने बोरिवलीपर्यंत प्रवास करता येणार आहे.
लोकल सेवांची संख्या कायम
या बदलानंतरही पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सेवांची संख्या 1,414 इतकीच राहणार आहे. वेळापत्रकात सहा नवीन सेवा सुरू करण्यात आल्या असून, कमी प्रवासीसंख्या असलेल्या सहा ऑफ-पीक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच आठवड्याच्या दिवसांतील एसी लोकल सेवा 145 वरून 147 करण्यात आल्या आहेत.
विरारकरांसाठी सकाळी दिलासा
सकाळच्या वेळेत विरारहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सकाळी 8.23 वाजताची विरार-दादर लोकल आता चर्चगेटपर्यंत धावणार आहे.ही लोकल सकाळी 9.48 वाजता चर्चगेटला पोहोचेल.


