मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. यात अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला, मुंबई विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांची नावे आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बच्या धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. खलिस्तान नॅशनल आर्मीने एक ईमेल पाठवला असून यात अनेक बड्या व्यक्ती आणि ठिकाणांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या ईमेलमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील 'जलसा' बंगला, पंजाब नॅशनल बँक (PNB), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महापौरांच्या कार्यालयाला टार्गेट करणार असल्याचा उल्लेख आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'चा कथित लक्ष्यांमध्ये समावेश
बच्चन यांच्या प्रसिद्ध जलसा बंगल्याबाहेर कार बॉम्बस्फोट केला जाऊ शकतो, असा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. हा हल्ला कधी होईल याची तारीखही त्यात दिली असून, ३१ डिसेंबरपर्यंत घरातच त्यांची हत्या होऊ शकते, अशी धमकी दिली आहे.
या धमकीच्या मेलमध्ये १९८४ च्या शीखविरोधी दंगली आणि खलिस्तान चळवळीचा संदर्भ दिला आहे. याशिवाय, २७ नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ याच्या कॉन्सर्टमध्येही हल्ला होऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे. न्यायालय आणि महापौरांच्या कार्यालयालाही लक्ष्य केले जाऊ शकते, असा दावा या मेलमध्ये केल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुंबई विमानतळावर स्फोट, न्यायालयावर हल्ला आणि २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी स्टेडियमवर हल्ला होऊ शकतो, असेही यात म्हटले आहे. लोकांनी कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ नये किंवा कोणतेही आयफोन उचलू नयेत, असा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था कडक
याआधी २३ ऑक्टोबरलाही असाच एक ईमेल आला होता, ज्यात बच्चन यांचे घर, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे कार्यालय आणि २७ नोव्हेंबरच्या दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला धमकी दिली होती.
त्यानंतर ६ नोव्हेंबरला आणखी एक ईमेल आला. त्यात बॉम्बे हायकोर्ट, बीएसई (BSE), जलसा आणि महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणांची नावे होती. या धमक्यांनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून या सर्व ठिकाणची सुरक्षा वाढवली आहे.
हे ईमेल कोणी पाठवले, त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का आणि ही धमकी किती खरी आहे, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, २३ ऑक्टोबरच्या ईमेलमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी झडती घेतली असता पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.














