मुंबईत जुलैच्या मुसळधार पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण मुंबईसह कोकणात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई : मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या काही दिवसांत विक्रमी पाऊस झाला. पण ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. दरम्यान, यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र पुढील काही दिवसांत शहर आणि आसपासच्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पावसाचा वेग मंदावला

मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जुलैच्या तुलनेत कमी पाऊस झाला. कुलाबा हवामान केंद्रात 36.2 मिमी, तर सांताक्रूझ येथे 83.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या सात दिवसांत मुंबईत दररोज सरासरी 11.9 मिमी पावसाची नोंद झाली. याउलट जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील काही भागांत अवघ्या 48 तासांत 300 मिमीहून अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे जुलैच्या तुलनेत ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात विक्रमी पाऊस

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सांताक्रूझ येथे 853 मिमी, तर कुलाबा येथे तब्बल 1017.5 मिमी पावसाची नोंद झाली होती. अवघ्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पावसाच्या आकडेवारीत मोठी भर पडली होती.

मान्सूनचा प्रभाव अद्याप कायम

यंदा देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग काहीसा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात वार्षिक सरासरीच्या सुमारे 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

कोकणात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

दरम्यान, हवामान विभागाने या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पालघर, ठाणे तसेच रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सध्या ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाऐवजी अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.