मुंबईत तुफान पाऊस, तासाभरात हाहाकार!

| Published : May 13 2024, 06:39 PM IST / Updated: May 13 2024, 06:51 PM IST

mumbai rain

सार

मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचं दिसून आलंय. मुंबई उपनगर आणि कोस्टल रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली आहे.

 

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाला सुरूवात झाली असून मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडूमध्ये मोठा पाऊस पडत असून रस्त्यांच्या कडेला पाण्याचा लोट असल्याचं दिसतंय. तर अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी मंदगतीने सुरू आहे. तर घाटकोपर ते वर्सोवाची मेट्रो व्यवस्थाही ठप्प झाल्याची माहिती आहे. पूर्व उपनगरात, विक्रोळी, भांडूप मुलुंडमध्ये मोठा पाऊस सुरू असल्याने वाहनं ही हळूहळू पुढे सरकत आहेत. घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं आहे. इतरही अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याची माहिती आहे.

मुंबई विमानतळाचं रनवे बंद

पाऊस, वादळी वारे यामुळे मुंबई विमानतळाचा रनवे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या आहेत.

पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळली

जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळली. जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याचा मुंबईला मोठा फटका बसल्याचं दिसतंय. जागोजागी झाडं कोसळल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबल्याचं दिसून आलंय.

कोस्टल रोडवर मुसळधार पाऊस

मुंबईतील कोस्टल रोडवर मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याची माहिती आहे. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून डोंबिवली, बदलापूरसह इतर ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत.

दादर भागामध्ये धुळीचं वादळ

दादर परिसरात धुळीचं वादळ आल्याने वातावर काहीसं धुरकट झाल्याचं दिसतंय. या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढल्याने पावसालाही सुरूवात सुरू आहे. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.