- Home
- Mumbai
- Mumbai Local : मुंबईकरांसाठी 'डबल लॉटरी'! आजपासून लोकलच्या 10 नव्या फेऱ्या, 2 नवीन स्टेशन; 'या' मार्गावर धावणार!
Mumbai Local : मुंबईकरांसाठी 'डबल लॉटरी'! आजपासून लोकलच्या 10 नव्या फेऱ्या, 2 नवीन स्टेशन; 'या' मार्गावर धावणार!
Mumbai Local : मध्य आणि हार्बर रेल्वेने नेरुळ-बेलापूर-उरण मार्गावर १० अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत, ज्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ५० झाली आहे. यासोबतच, तरघर आणि गव्हाण ही दोन नवीन रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली.

मुंबईकरांसाठी 'डबल लॉटरी'!
मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने एकाच वेळी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. नेरुळ–बेलापूर–उरण रेल्वेमार्गावर 10 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून, त्याचबरोबर तरघर आणि गव्हाण ही दोन नवी रेल्वे स्थानकंही आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहेत.
प्रवाशांना मोठा दिलासा
नेरुळ–बेलापूर–उरण विभागात वाढवण्यात आलेल्या 10 नवीन लोकल जोड्यांमुळे या मार्गावरील प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. यामुळे उरण मार्गावरील लोकल सेवांची संख्या 40 वरून थेट 50 वर पोहोचणार असून, रोजच्या गर्दीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
तरघर आणि गव्हाण स्थानकांचा लाभ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असलेले तरघर स्थानक भविष्यात प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक सोयीचे ठरेल, तसेच आसपासच्या रहिवाशांना थेट उपनगरीय रेल्वेचा फायदा मिळणार आहे. दुसरीकडे गव्हाण स्थानक सुरू झाल्यामुळे उरण परिसरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होऊन स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
नवीन लोकल वेळापत्रक काय आहे?
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार
उरणहून पहिली लोकल सकाळी 5.35 वाजता तर शेवटची लोकल रात्री 10.05 वाजता सुटेल
बेलापूरहून लोकल सेवा सकाळी 5.45 ते रात्री 10.15 पर्यंत उपलब्ध असेल
नेरुळहून सकाळी 6.05 पासून रात्री 9.30 वाजेपर्यंत लोकल धावतील
या नव्या वेळांमुळे सकाळी आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
नवी मुंबईच्या विकासाला चालना
या बदलांमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, गर्दी आटोक्यात येईल आणि दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी बनेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी नवीन वेळापत्रकाची माहिती घेऊन आपले प्रवास नियोजन करावे. उरण रेल्वे कॉरिडोरमधील ही सुधारणा नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी ठरणार आहे.

