- Home
- Mumbai
- Mumbai Local : तुमचा प्रवास आता १००% सुरक्षित! रेल्वेचा असा प्रयोग जो दारात लटकणाऱ्यांची 'एन्ट्री'च बंद करणार; वाचा सविस्तर
Mumbai Local : तुमचा प्रवास आता १००% सुरक्षित! रेल्वेचा असा प्रयोग जो दारात लटकणाऱ्यांची 'एन्ट्री'च बंद करणार; वाचा सविस्तर
Mumbai Local : मुंब्रा-दिवा दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने लोकल डब्यांच्या रचनेत बदल करण्यास सुरुवात केली. याअंतर्गत, दरवाज्याजवळील पन्हाळीचा आकार धनुष्यबाणासारखा केला जात आहे, जेणेकरून प्रवाशांना त्यावर लटकून प्रवास करता येणार नाही.

मुंबईकरांनो लक्ष द्या! पायरीवरचा जीवघेणा प्रवास आता इतिहास होणार
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा कणा मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र वाढती गर्दी, उघडे दरवाजे आणि फुटबोर्डवर उभे राहून केलेला प्रवास यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने लोकल डब्यांच्या रचनेत महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे.
मुंब्रा-दिवा दुर्घटनेनंतर हालचालींना वेग
मध्य रेल्वेच्या मुंब्रा–दिवा मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालातील शिफारशी आता प्रत्यक्षात उतरवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोकल डब्यांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या दरवाजाजवळील पन्हाळीच्या रचनेत बदल करण्यात येत आहेत.
अपघातांचे मूळ कारण काय?
9 जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. चौकशी अहवालात असे नमूद करण्यात आले की, लोकल गाड्यांचे दरवाजे कायम उघडे असल्याने आणि प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर किंवा दरवाजाजवळील पन्हाळीला धरून प्रवास करतात. यामुळे तोल जाऊन पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
लोकल डब्यांच्या डिझाइनमध्ये काय बदल?
या धोक्याला आळा घालण्यासाठी कुर्ला कारशेडमध्ये काही लोकल डब्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत. दरवाजालगत असलेली पन्हाळी आता नव्या डिझाइनमध्ये तयार केली जात असून, तिचा आकार धनुष्यबाणासारखा उंचावलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना ती पकडून लटकून प्रवास करणे शक्य होणार नाही.
यशस्वी ठरल्यास सर्व डब्यांत बदल
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात सर्व लोकल डब्यांमध्ये ही सुधारित रचना लागू केली जाणार आहे. त्यामुळे दरवाजात लटकून प्रवास करण्यावर मोठ्या प्रमाणात आळा बसेल आणि अपघातांचा धोका कमी होऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

