Mumbai Horror : 'मी पहिल्यांदाच असं काहीतरी करत होतो. मला भीती वाटत होती. व्हिडिओ कॉलद्वारे मॅडमनी मला मदत केली,' असं त्या महिलेच्या मदतीला धावून आलेला तरुण व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येतो.

Mumbai Horror : रात्री एक वाजता ट्रेनमध्ये प्रसूती वेदनांनी त्रस्त असलेल्या महिलेच्या मदतीला एक अनोळखी तरुण धावून आला. ही हृदयस्पर्शी घटना ट्रेनमधील दुसऱ्या एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रत्यक्षदर्शी मनजीत ढिल्लन यांनी शेअर केलेल्या व्हायरल इंस्टाग्राम पोस्टनुसार, महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचे लक्षात येताच, त्या अनोळखी तरुणाने तात्काळ आपत्कालीन चेन खेचून ट्रेन थांबवली.

'हा माणूस खरोखरच धाडसी आहे - त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पहाटे १ वाजताची ही घटना आहे, त्यावेळी ट्रेन राम मंदिर स्टेशनवर होती, तरुणाने ट्रेनची आपत्कालीन चेन खेचून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. हे सांगताना माझ्या अंगावर अजूनही काटा येतोय - त्या महिलेचं बाळ अर्धे बाहेर आलं होतं, अर्धे आत आणि अर्धे बाहेर. त्या क्षणी, देवानेच या भावाला काही कारणास्तव तिथे पाठवलं असं मला वाटलं,' असं त्या प्रवाशाने लिहिलं आहे.

'मी पहिल्यांदाच असं काहीतरी करत होतो. मला भीती वाटत होती. व्हिडिओ कॉलद्वारे मॅडमनी मला मदत केली,' असं त्या महिलेच्या मदतीला धावून आलेला तरुण व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येतो. पोस्टनुसार, त्या तरुणाने महिलेला सुखरूप प्रसूतीसाठी मदत केली. इतर प्रवासीही मदतीसाठी पुढे आले. अनेक डॉक्टरांना फोन करण्यात आले. अखेर एका महिला डॉक्टरने तरुणाला फोनवर सूचना देऊन मदत केली. तरुणाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले आणि महिलेने ट्रेनमध्येच बाळाला जन्म दिला, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

View post on Instagram

रुग्णालयाचा निष्काळजीपणा

त्यावेळी तरुणाने दाखवलेले धाडस अतुलनीय होते, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. ती महिला आणि तिचे कुटुंब यापूर्वी जवळच्या रुग्णालयात गेले होते, पण त्यांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना या ट्रेनने परतावे लागले. त्या रुग्णालयाबद्दल विचार करून संताप वाटतो, असेही प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने म्हटले आहे. नंतर महिलेला तिच्या कुटुंबाने रुग्णालयात दाखल केले.

त्या अज्ञात तरुणानेच एका आईचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचवले, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका पूर्णपणे अनोळखी महिलेला योग्य वेळी योग्य मदत करणाऱ्या त्या तरुणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.