मुंबईत काही महिलांनी धावत्या लोकलमध्ये आपल्या मैत्रिणीचं केळवण साजरं केलं. फुलांची सजावट आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र, सार्वजनिक ठिकाणी असा खासगी कार्यक्रम करण्यावरून नेटकऱ्यांनी टीका केली असून रेल्वे प्रशासनानेही याची दखल घेतली आहे.
मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना काही महिलांनी चक्क डब्यातच आपल्या मैत्रिणीसाठी एक सरप्राईज प्री-वेडिंग सेलिब्रेशन म्हणजेच केळवण आयोजित केलं होतं. त्यांनी या डब्याचा वापर चक्क एका छोट्या हॉलसारखा केला. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या खासगी कार्यक्रमांचं आयोजन करावं का? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित करत या सेलिब्रेशनवर टीका केली.
मुंबई हेरिटेज या एक्स (X) अकाउंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही महिला डब्यात स्टिकर्स, तोरण आणि फुलांची सजावट करताना दिसत आहेत. एका महिलेच्या हातात सजवलेले ताटही होते. यावरून या ग्रुपने आधीच या सेलिब्रेशनची पूर्ण तयारी केली होती, हे स्पष्ट होतं.
या महिलांनी होणाऱ्या नवरीवर फुलांचा वर्षाव केला, तिला मिठी मारली आणि पारंपरिक पद्धतीने तिचं केळवण साजरं करून तिला आशीर्वाद दिले. घरच्या घरी जसं केळवण होतं, अगदी तसंच हे सेलिब्रेशन होतं.
मुंबई हेरिटेजने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन प्री-वेडिंग कार्यक्रम आहे, ज्यात मित्र-मंडळी आणि नातेवाईक नवरी किंवा नवरदेवाला आशीर्वाद आणि प्रेम देतात.
त्यांनी पुढे कॅप्शनमध्ये म्हटलंय, "यावेळी हे केळवण घरात नाही, तर चक्क मुंबई लोकलमध्ये पार पडलंय."
व्हायरल (Viral) व्हिडिओ पाहा
व्हिडिओमध्ये या महिला आनंदाने सेलिब्रेशन करत असल्या तरी, अनेक सोशल मीडिया युजर्सनी सार्वजनिक ट्रेनमध्ये असा कार्यक्रम करण्यावर आक्षेप नोंदवला.
हा व्हिडिओ रेल्वे सेवाच्या (Railway Seva) देखील लक्षात आला आणि त्यांनी या पोस्टवर रिप्लाय दिला. रेल्वे सेवाच्या अकाउंटने संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करून या प्रकरणाची दखल घेतली असल्याचं स्पष्ट केलं.














