मुंबईतील मालाडमध्ये एका क्लिनिकच्या फ्रीझरमध्ये ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह तब्बल चार वर्षे ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कायदेशीर गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पोलीस आता तपास करत आहेत.
मुंबई : मालाडमधील एका क्लिनिकमध्ये तब्बल चार वर्षे एका ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेमुळे पोलीसही चक्रावले असून ते या कायदेशीर गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. २०२२ मध्ये या वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी हा मृतदेह अमेरिकेतील (युनायटेड स्टेट्स) क्रायोनिक्स सुविधेमध्ये पाठवण्याच्या आशेने क्लिनिकमध्ये जतन करून ठेवला होता. भारतात अशा प्रकारे मृतदेह जतन करणं कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का आणि तसं असल्यास किती काळ मृतदेह ठेवता येतो, याबाबत मुंबई पोलीस आता तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
सोमवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कुरार पोलिसांनी या पॉलिक्लिनिकवर छापा टाकला. तिथे त्यांना एका फ्रीझरमध्ये या वृद्धाचा मृतदेह सापडला. नूतनीकरणाच्या कामामुळे हे क्लिनिक गेल्या महिनाभरापासून बंद होतं, अशी माहिती समोर आली आहे.
यानंतर पोलिसांनी वृद्धाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांच्या कुटुंबात त्यांची वृद्ध पत्नी आणि मुलं आहेत. २०२२ मध्ये या वृद्धाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं स्पष्ट करणारी कागदपत्रं कुटुंबीयांनी पोलिसांना दाखवली.
मुलांनी पोलिसांना सांगितलं की, वडिलांच्या मृत्यूचा त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांना वडिलांचा मृतदेह जास्तीत जास्त काळ जतन करून ठेवायचा होता. यासाठी त्यांनी इंटरनेटवर माहिती शोधली, तेव्हा त्यांना अमेरिकेत क्रायोनिक्स सेवा देणाऱ्या संस्थांबद्दल समजलं.
क्रायोनिक्स म्हणजे काय? तर, कायदेशीररित्या मृत घोषित केलेल्या व्यक्तींचा मृतदेह अत्यंत कमी तापमानात (साधारणपणे लिक्विड नायट्रोजन वापरून) जतन करून ठेवणं. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाल्यास या व्यक्तींना पुन्हा जिवंत करता येईल, अशी यामागची आशा असते. पेशी, उती आणि भ्रूण जतन करणं ही एक मान्यताप्राप्त वैज्ञानिक पद्धत असली, तरी संपूर्ण मानवी मृतदेह जतन करणं हा अजूनही एक प्रयोगच आहे. मुख्य प्रवाहातील शास्त्रज्ञांनी याला अद्याप मान्यताप्राप्त वैद्यकीय पद्धत म्हणून स्वीकारलेलं नाही.
हा मृतदेह अमेरिकेत पाठवता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी कुटुंबीयांनी तिथल्या एका संस्थेशी संपर्क साधायला सुरुवात केली होती. तसंच, अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था होईपर्यंत मृतदेह भारतातच जतन करून ठेवता येईल का, याबाबत त्यांनी कायदेशीर सल्लाही घेतला होता.
या सगळ्या प्रक्रियेदरम्यान, तो मृतदेह क्लिनिकमध्येच पडून होता. विशेष म्हणजे, कुटुंबीयांनी किंवा क्लिनिक प्रशासनाने याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही कल्पना दिली नव्हती.
सोमवारी रात्री स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतरच पोलिसांना या जतन केलेल्या मृतदेहाबद्दल समजलं. २०२२ पासून क्लिनिकसाठी जागा भाड्याने देणाऱ्या घरमालकानेही पोलिसांना सांगितलं की, आतमध्ये मृतदेह ठेवल्याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती. घरात कोणी आजारी पडल्यास आपण आणि आपले कुटुंबीय याच क्लिनिकमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी यायचो, असंही या घरमालकाने स्पष्ट केलं.
पोलिसांनी मंगळवारी कुटुंबीय, क्लिनिक प्रशासन आणि घरमालकाचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप याप्रकरणी कोणताही औपचारिक गुन्हा दाखल केलेला नाही.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, सुरक्षेसाठी क्लिनिकबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


