Bakri Eid Mira Road : मीरा रोडमध्ये बकरी ईदच्या कुर्बानीच्या तयारीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक आणि सोसायटीच्या सामायिक जागांमध्ये कुर्बानीला भाजप नगरसेविका प्रीति सातम यांनी विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला.
Bakri Eid Mira Road : मीरा रोड परिसरात बकरी ईदच्या तयारीवरून वातावरण चांगलेच तापले असून सार्वजनिक आणि सोसायटीच्या सामायिक जागांमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीच्या तयारीला विरोध वाढताना दिसत आहे. भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी या प्रकरणात तीव्र भूमिका घेत प्रशासनाला नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

“सार्वजनिक जागेत कुर्बानी मान्य नाही” – प्रीती सातम
भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी सार्वजनिक रस्ते किंवा गृहनिर्माण सोसायटींच्या सामायिक जागांमध्ये कुर्बानीचे विधी करण्यास विरोध दर्शवला. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे धार्मिक विधी केवळ प्रशासनाने अधिकृत केलेल्या ठिकाणीच पार पडले पाहिजेत. त्यांनी यावेळी प्रशासनाला इशारा देत म्हटलं की, “महापालिका आणि पोलिसांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. जर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”
पूनम क्लस्टरमध्ये उभारलेली शेड पाडली
मीरा रोडमधील उच्चभ्रू पूनम क्लस्टर या निवासी संकुलात बकरी ईदसाठी कुर्बानीची तयारी म्हणून तात्पुरती शेड उभारण्यात आली होती. याला स्थानिक हिंदू रहिवासी आणि काही संघटनांनी विरोध दर्शवला.त्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई करत संबंधित शेड हटवली. मात्र, पुन्हा ती उभारण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात तणाव वाढला.
दोन गट आमनेसामने; चाकूहल्ल्याचा आरोप
वाद वाढल्यानंतर दोन्ही समुदायांतील काही गट आमनेसामने आल्याची माहिती समोर आली. उशिरा रात्री झालेल्या गोंधळात एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरातील रस्त्यांवरही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी धक्काबुक्की आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
पोलिसांचा लाठीचार्ज; परिसरात कडेकोट बंदोबस्त
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज करत जमाव पांगवला. दरम्यान, सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी डुक्कर आणल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे वातावरण आणखी संवेदनशील बनले आहे. सध्या मीरा रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बकरी ईदपूर्वी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.


