मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसादरम्यान तीन मजली चाळ कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या परिवाराला आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. मंडाला येथील जनता नगर परिसरातील तीन मजली चाळीचा काही भाग अचानक कोसळला गेला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. एकजण जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांकडून मृत परिवाराच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकार या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाच्या मागे खंबीर उभे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

Scroll to load tweet…

नक्की काय घडले?

ही दुर्घटना रविवारी (5 जुलै) रात्री सुमारे 8.30 वाजताच्या आसपास मंडाला परिसरातील जनता नगर येथील चाळ क्रमांक 5 मध्ये घडली. प्राथमिक माहितीनुसार, तीन मजली चाळीतील दोन ते तीन खोल्या अचानक कोसळल्या गेल्या. स्थानिकांच्या मते, कोसळलेल्या भिंतीचा काही भाग आजूबाजूला असणाऱ्या झोपड्यांवरही पडला गेला.

सहा जणांचा मृत्यू, एक जण जखमी

महापालिकेच्या माहितीनुसार, दुर्घटनेत चार महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. याच्यावर गोवंडीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनीही जखमीसह कुटुंबियांची भेट घेतली.

NDRFसह विविध यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य

घटनेनंतर अग्निशमन दल, मुंबई पोलीस, महापालिका, '108' रुग्णवाहिका सेवा आणि एनडीआरएफ (NDRF) यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

मुंबईतील जनजीवन विस्कळीत

सोमवारीही मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-पुणे दरम्यानच्या काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या आहेत. याशिवाय रायगडमधील उपनगरी रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे. हवामान खात्याने आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनावश्यक कारणास्तव घराबाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.