- Home
- Mumbai
- मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! दादर–CSMT वरील ताण कमी होणार; एक्सप्रेससाठी नवी टर्मिनस, लोकल प्रवाशांना दिलासा
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! दादर–CSMT वरील ताण कमी होणार; एक्सप्रेससाठी नवी टर्मिनस, लोकल प्रवाशांना दिलासा
दादर आणि CSMT स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 10 लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या LTT आणि पनवेल येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे मुख्य मार्गावरील ताण कमी होऊन लोकल सेवा सुधारण्यास आणि 15 नवीन लोकल सुरू करण्यास मदत होईल.

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! दादर–CSMT वरील ताण कमी होणार
मुंबई : दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ही मुंबईतील सर्वाधिक वर्दळीची रेल्वे स्थानके आहेत. या दोन्ही ठिकाणची गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दादर आणि CSMT वरून सुटणाऱ्या एकूण 10 लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या आता लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल येथून धावणार आहेत. या निर्णयामुळे मुख्य मार्गावरील ताण कमी होणार असून, उपनगरीय लोकल सेवांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
एक्सप्रेस हलणार, लोकलचा मार्ग मोकळा
सध्या मध्य व हार्बर मार्गांवर लोकल आणि एक्सप्रेसची एकाचवेळी मोठी वर्दळ असल्याने लोकल गाड्या वारंवार उशिराने धावत आहेत. याचा थेट फटका चाकरमान्यांना बसत असून, ऑफिसमध्ये उशिरा पोहोचण्याची समस्या रोजची झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने CSMT वरून धावणाऱ्या 5 आणि दादरवरून सुटणाऱ्या 5 अशा एकूण 10 एक्सप्रेस गाड्यांचे टर्मिनस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता LTT आणि पनवेल येथून सुरू केल्या जाणार आहेत.
मुख्य मार्गांवरील ताण होणार कमी
या बदलामुळे CSMT–कर्जत-खोपोली आणि CSMT–कसारा मार्गावरील वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. एक्सप्रेस गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून धाववल्या जाणार असल्याने लोकल सेवांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही.
15 नवीन लोकलसाठी वाट मोकळी
10 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलल्यामुळे तब्बल 15 अतिरिक्त लोकल गाड्यांसाठी स्लॉट उपलब्ध होणार आहेत. परिणामी, पीक अवर्समध्ये 40 ते 50 हजार अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकतील. लोकल वेळेवर धावल्यास नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
उशिरा धावणाऱ्या एक्सप्रेसचा लोकलवर परिणाम थांबणार
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमुळे सध्या मुंबई लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. विशेषतः हिवाळ्यात उत्तर भारतातून येणाऱ्या अनेक गाड्या धुक्यामुळे विलंबित होतात, ज्याचा परिणाम थेट सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल सेवांवर होतो. हाच त्रास टाळण्यासाठी एक्सप्रेस गाड्या LTT आणि पनवेलकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या गाड्यांचा समावेश?
या बदलामध्ये राज्यराणी एक्सप्रेस, नागरकोइल एक्सप्रेस, दादर–तिरुनेलवेली सुपरफास्ट एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस यांसह इतर काही गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या गाड्यांच्या डब्यांची संख्या 16–20 वरून वाढवून 24 करण्याचा निर्णयही मध्य रेल्वेने घेतला आहे.

