बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने (CBI) नवीन एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने एक नवीन एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली असून, सीबीआयच्या एफआयआरमध्ये आमदार आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांच्या नावांचा उल्लेख आहे. ८ जून २०२० रोजी दिशाचा मालाडमधील एका फ्लॅटवरून पडून मृत्यू झाला होता. या घटनेच्या सहा दिवसांनंतर सुशांत सिंह राजपूतही मृतावस्थेत आढळला होता. दिशाचा मृत्यू हा अपघात नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. यानंतर सीबीआयने हत्या, सामूहिक बलात्कार, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे आणि खोटी माहिती देणे यांसारखी गंभीर कलमे लावून तपास सुरू केला आहे. सीबीआयच्या एफआयआरनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे, अभिनेते दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि रिया चक्रवर्ती यांच्या भूमिकेची चौकशी केली जाणार आहे. यासोबतच, प्रकरणातील रेकॉर्ड नष्ट करणे, अधिकृत कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आणि आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांचा गैरवापर करणे, अशा आरोपांमध्ये सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

सीबीआयने मुंबई पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि फाईल्स तात्काळ हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे सांगत ही केस बंद केली होती. मात्र, दिशाच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी, आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांच्या तपासात गंभीर त्रुटी आढळल्याचे आणि जवळपास सहा वर्षे एफआयआर दाखल न केल्याने अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने २ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.