उद्या (12 ऑगस्ट) अंगारकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मुंबईतील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशातच मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. 

मुंबई : अंगारकी चतुर्थीचा सण येत्या 12 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मुंबईतील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. खरंतर, तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थी असा दुर्मीळ योग जुळून आला आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. मागील वेळेस हा योग 8 ऑगस्ट 2005 रोजी आला होता. श्रावण मास आणि चातुर्मास अशा पवित्र काळात हा योग आल्यानं त्याला अधिक धार्मिक महत्त्व प्राप्त होतं. यंदा चंद्रोदय रात्री 9 वाजून 17 मिनिटांनी होणार आहे.

दर्शनासाठी विशेष व्यवस्था

भाविकांच्या प्रचंड गर्दीचा अंदाज घेऊन मंदिर ट्रस्टने दर्शनासाठी सुसज्ज नियोजन केले आहे. पहाटे 3.15 वाजता महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होईल आणि रात्री 11.50 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील. याशिवाय सोमवारी (11 ऑगस्ट) मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून पहाटे 3.15 वाजेपर्यंत आणि मंगळवारी (12 ऑगस्ट) पहाटे 3.50 पासून रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन उपलब्ध असेल. रात्री 9 ते 9.30 दरम्यान नैवेद्य व आरतीमुळे दर्शनरांग थांबवण्यात येईल, त्यानंतर 9.30 ते 11.50 पर्यंत पुन्हा दर्शन चालू राहील.

आरती व नैवेद्याचे वेळापत्रक

पहाटे 3.15 वाजता महापूजा आणि आरती होईल. दुपारी 12.15 वाजता नैवेद्य, संध्याकाळी 7 वाजता धूपआरती (यावेळीही दर्शनाची रांग सुरू राहील) तर रात्री 9 वाजता नैवेद्य आणि आरती होणार आहे. भाविकांना वेळापत्रकानुसार दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सुरक्षा व सोयी-सुविधा

मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय पथक आणि दोन रुग्णवाहिका (एक कार्डिअ‍ॅक) तैनात असतील. अग्निशमन दल, अग्निशामक उपकरणे आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून बेस्टचे अधिकारी-कर्मचारीही उपस्थित राहतील. भाविकांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, मेट्रो 3 च्या सिद्धिविनायक स्थानकामुळे मेट्रोनेही येणं सोयीस्कर होईल. मंदिरात कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्यास मनाई आहे.

लाईव्ह दर्शन कुठे आणि कसे पहाल? 

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री सिद्धविनायचे लाईव्ह दर्शन त्यांच्या फेसबुक पेजवरुन घेऊ शकता. याशिवाय मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवरुनही पाहू शकता.