बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी "26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला आम्ही इथे येऊ," असा थेट इशारा दिला आहे. यासोबतच आमदार महेश लांडगे यांनीही कठोर भूमिका मांडली असून, या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या मोर्चात भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना संग्राम जगताप यांनी थेट इशारा देणारी भूमिका घेतली. “26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला आम्ही इथे येऊ,” असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे बीडसह राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात खळबळ उडाली आहे.

काय आरोप केले?
यावेळी बोलताना त्यांनी पोलिस प्रशासनावरही टीका केली. काही घटनांमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या लोकांवरच दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदू समाजाने आता संघटित होण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं. दरम्यान, या मोर्चात बोलताना आमदार महेश लांडगे यांनीही कठोर भूमिका मांडली. “कायदा मानत नसतील तर दांडके हातात घ्यावे लागतील,” असं वक्तव्य त्यांनी केल्याचं समोर आलं आहे. तसेच पोलिसांनी निष्पक्ष कारवाई न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
विरोधकांकडून टीका सुरु
संग्राम जगताप आणि महेश लांडगे यांच्या वक्तव्यांवरून विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. समाजात तणाव निर्माण करणारी भाषा वापरली जात असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांनी केला आहे. तर समर्थकांनी मात्र हिंदू समाजाच्या भावना व्यक्त केल्याचं म्हणत या भूमिकेचं समर्थन केलं आहे. बीडमध्ये झालेल्या या मोर्चानंतर राज्यात पुन्हा एकदा धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवरून वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन याकडे कशा पद्धतीने पाहते आणि पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.


