- Home
- Maharashtra
- Weather Alert : अवघ्या 24 तासांत हवामानाचा मूड बदलला! प्रजासत्ताक दिनी पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे बरसणार?
Weather Alert : अवघ्या 24 तासांत हवामानाचा मूड बदलला! प्रजासत्ताक दिनी पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे बरसणार?
Weather Alert : राज्यात प्रजासत्ताक दिनी हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली असून इतर भागांत ढगाळ वातावरण, धुके, उष्णतेचे संमिश्र चित्र पाहायला मिळेल.

प्रजासत्ताक दिनी पावसाची एन्ट्री!
मुंबई : राज्यातील हवामानाने सध्या नागरिकांची चांगलीच परीक्षा पाहायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण, सकाळचे धुके आणि दुपारनंतर जाणवणारी उष्णता असे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडीचा जोर ओसरला असून, अनेक भागांत किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात हवामानाबाबत उत्सुकता वाढली आहे. तर पाहूया, राज्यातील विविध भागांमध्ये हवामान कसे राहणार आहे.
कोकण विभाग
कोकण किनारपट्टीवर हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत सकाळच्या वेळेत धुक्याची हलकी दुलई जाणवू शकते, तर दिवसभर ढगांची ये-जा सुरू राहील. पावसाची शक्यता नसली तरी उष्णतेचा त्रास जाणवू शकतो.
कमाल तापमान: सुमारे 32°C
किमान तापमान: सुमारे 19°C
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कमाल तापमान: सुमारे 27°C
किमान तापमान: सुमारे 15°C
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. पुणे आणि परिसरात सकाळी धुक्याची शक्यता, तर त्यानंतर दिवसभर हवामान कोरडे राहील. सकाळी गारवा आणि दुपारनंतर उष्णतेची तीव्रता जाणवू शकते.
कमाल तापमान: सुमारे 30°C
किमान तापमान: सुमारे 14°C
मराठवाडा
मराठवाड्यातही सकाळच्या वेळेत धुके आणि त्यानंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी धुके तर दुपारनंतर ढगाळ हवामान जाणवू शकते.
कमाल तापमान: सुमारे 29°C
किमान तापमान: सुमारे 16°C
विदर्भ
विदर्भात सकाळी हवामान मुख्यतः निरभ्र राहील, मात्र दुपारनंतर ढगांची गर्दी होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये सकाळी सौम्य गारवा तर दुपारी उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.
कमाल तापमान: सुमारे 30°C
किमान तापमान: सुमारे 14°C
नागरिकांसाठी सूचना
जानेवारीच्या अखेरीस हवामानात होणारे हे बदल लक्षात घेता, कुठे थंडी, कुठे उकाडा तर कुठे हलका पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

