पुण्यातल्या एका कॉलेजमधून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिसऱ्या मनसे कार्यकर्त्याला, आशिष साबळेला, अटक केली आहे. या प्रकरणात अमित ठाकरे आणि इतर २५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, मनसे आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे.

मुंबई : पुण्यातल्या एका कॉलेजमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी मुंबईतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) एका कार्यकर्त्याला अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला भेट दिली होती, तेव्हा ही घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो लावल्याचं पाहून, तो फोटो काढायला अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर, पुणे शहर पोलिसांच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे आणि मनसेच्या २५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात याआधी दोघांना अटक झाली होती.

आशिष साबळे असं अटक झालेल्या कार्यकर्त्याचं नाव असून, पुणे पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली. गुरुवारी सकाळी त्याला पुण्यातील कोर्टात हजर केलं जाणार आहे. साबळेच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या तीन झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मनसे आणि भाजपमध्ये तणाव

दरम्यान, या प्रकरणामुळे मनसे आणि भाजपमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान 'शिवतीर्थ' बाहेर सोमवारी मोठा ड्रामा बघायला मिळाला. भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, त्यांचं 'स्वागत' करण्यासाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते जमले होते. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो अमित ठाकरे यांनी हटवल्याच्या प्रकरणानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.

या परिस्थितीवर बोलताना मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी एएनआयला सांगितलं, "आम्ही ऐकलं की भाजप कार्यकर्ते अमित ठाकरेंविरोधात आंदोलन करायला इथे येणार आहेत. म्हणून आम्ही त्यांचं 'स्वागत' करायला इथे उभे आहोत. या, आम्ही तुमची वाट बघतोय. पण अजूनपर्यंत कुणीच आलेलं नाही; फक्त अफवाच आहेत. कधी येणार ते? लवकर या, सगळे मनसैनिक तुमची वाट बघत आहेत."

भानुशाली यांनी भाजप युवा मोर्चाला कडक इशाराही दिला. ते म्हणाले, "रिकाम्या धमक्या देणं बंद करा. उलट तुम्हीच सांगा आम्ही कुठे यायचं. पण जर तुम्ही इथे आलात, तर सोबत काही रुग्णवाहिका (ambulances) पण घेऊन या; नाहीतर परत जायला त्रास होईल." मनसे नेते अविनाश जाधव यांनीही राज ठाकरेंच्या निवासस्थानाला 'मंदिर' संबोधत अशीच भावना व्यक्त केली. भाजप युवा मोर्चाने दादरमधील निवासस्थानावर आंदोलन करण्याची योजना आखली होती, पण प्रत्यक्षात एकही कार्यकर्ता तिथे पोहोचला नाही.

अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित राज ठाकरे आणि इतर २०-२५ अज्ञात पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पुण्यातील गणेशखिंड परिसरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये ही घटना घडली होती.

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एफआयआरनुसार, ही घटना सोमवारी दुपारी १२:३० ते १:१५ च्या दरम्यान घडली. अमित ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसोबत परवानगीशिवाय कॉलेजच्या कार्यालयात घुसले. तक्रारदार राजेंद्र काशिराम पाटील यांनी आरोप केला आहे की, या गटाने कार्यालयात घुसून तिथे लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकला.

या गटाने तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धमकावलं, कार्यालयात थांबून घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला, असाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ठाकरे आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.