सार

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन.सी. यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे.

शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्यावरील अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून आलं आहे. अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावेळी महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अरविंद सावंत यांच्यावर टीका केली आहे. 

अरविंद सावंत काय म्हणाले? 
“त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं अरविंद सावंत यांनी यावेळी बोलताना म्हटलं होत. राष्ट्रीय महिला आयोगाने याबाबतच्या तक्रारीची दखल घेतली असून अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अरविंद सावंत यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 

विजया रहाटकर यांनी काय म्हटलं? 
“शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या खासदार शायना एन. सी. यांच्याबाबत अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं आहे. दिवाळी सुरु आहे, लक्ष्मीपूजन होत आहे. या पवित्र आनंद पर्वात खासदार सारखे जबाबदार लोकप्रतिनिधी महिलांच्या विरोधात अशाप्रकारचं वक्तव्य करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. शायना एन. सी. यांनी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दाखल घेत कारवाई केली पाहिजे” असं विजया यांनी म्हटलं आहे.