सार

महाराष्ट्राच्या राजकारणात बिटकॉइन व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या क्लिपमध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा आवाज असल्याचे म्हटले आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या बिटकॉइन व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (पवार गट) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आवाज असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बेकायदेशीरपणे बिटकॉइनचा वापर करत असल्याचा आरोप करणारी आणि त्यांच्या बिटकॉइन व्यवहाराच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मंगळवारी प्रसिद्ध झाली.

यावर बारामतीत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, ‘मी पटोले यांना अनेक वर्षांपासून ओसतो. तो त्यांचाच आवाज आहे. दुसरा आवाज सुप्रिया सुळे यांचाच आहे.’ दिल्लीत बोलताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ‘या प्रकरणाबद्दल राहुल गांधी यांनी उत्तर द्यायला हवे.’

दरम्यान, ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करणारे निवृत्त आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

मात्र, सुप्रिया सुळे यांनी आपल्यावरील आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले आहे. ‘अजित पवार काहीही बोलू शकतात. ऑडिओ क्लिप बनावट आहे. ती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार करण्यात आली आहे. अलीकडेच खासदार सुधा मूर्ती यांच्या आवाजाचेही असेच बनावट क्लिप तयार करण्यात आले होते. याबाबत मी तक्रारही दाखल केली आहे,’ असे त्या म्हणाल्या.