- Home
- Maharashtra
- ST Bus : थर्टीफस्टला फिरायचंय? एसटी महामंडळाची भन्नाट ऑफर ‘आवडेल तिथे प्रवास’, कमी पैशांत राज्यभर व परराज्यात भटकंती
ST Bus : थर्टीफस्टला फिरायचंय? एसटी महामंडळाची भन्नाट ऑफर ‘आवडेल तिथे प्रवास’, कमी पैशांत राज्यभर व परराज्यात भटकंती
MSRTC New Year Travel Offer : ख्रिसमस, नववर्षाच्या सुट्ट्यांसाठी, एसटी महामंडळाने 'आवडेल तिथे प्रवास' ही खास योजना आणली आहे. या योजनेत प्रवाशांना ४ किंवा ७ दिवसांच्या पासवर मोठ्या सवलती मिळत असून कमी खर्चात महाराष्ट्रात, परराज्यात प्रवास करता येणारय.

थर्टीफस्टला फिरायचंय? एसटी महामंडळाची भन्नाट ऑफर ‘आवडेल तिथे प्रवास’
मुंबई : ख्रिसमस, थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे अनेक जण फिरण्याचा बेत आखत आहेत. अशा प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) एक खास आणि खिशाला परवडणारी योजना जाहीर केली आहे. ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेअंतर्गत आता प्रवाशांना चार किंवा सात दिवसांत महाराष्ट्रासह परराज्यातही मोकळेपणाने प्रवास करता येणार आहे. ही योजना विशेषतः भटकंतीची आवड असणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार असून, कमी खर्चात जास्त प्रवास करण्याची सुवर्णसंधी एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
पासचे दर मोठ्या प्रमाणात कमी
एमएसआरटीसीने या योजनेतील पासच्या दरांमध्ये अलीकडेच मोठा बदल केला आहे. प्रवासाचा कालावधी, बसचा प्रकार आणि वयोगट लक्षात घेऊन पासचे दर थेट 200 ते 800 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी 50 टक्के सवलत, तर 18 वर्षांवरील प्रवाशांना 60 ते 75 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
पूर्वी साध्या एसटी बसमधून सवलतीच्या चार दिवसांच्या प्रवासासाठी प्रवाशांना 1814 रुपये मोजावे लागत होते. आता तेच शुल्क 1364 रुपये इतके करण्यात आले आहे. म्हणजेच थेट 450 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तसेच 12 मीटर ई-शिवाई बस पासचे दरही 2681 रुपयांवरून 2072 रुपये करण्यात आले असून, तब्बल 789 रुपयांचा फायदा प्रवाशांना होणार आहे. सर्व प्रकारच्या बसच्या पासचे दर स्वस्त झाल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
चार दिवसांच्या पासचे नवे दर (प्रौढांसाठी)
साधी एसटी बस: जुने ₹1814 - नवे ₹1364
शिवशाही बस: जुने ₹2533 - नवे ₹1818
ई-शिवाई बस: जुने ₹2861 - नवे ₹2072
5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी (चार दिवस)
साधी बस: ₹910 - ₹685
शिवशाही: ₹1269 - ₹911
ई-शिवाई: ₹1433 - ₹1038
सात दिवसांच्या पासचे नवे दर (प्रौढांसाठी)
साधी बस: ₹3171 - ₹2638
शिवशाही: ₹4429 - ₹3175
ई-शिवाई: ₹5003 - ₹3619
5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी (सात दिवस)
साधी बस: ₹1588 - ₹1194
शिवशाही: ₹2217 - ₹1590
ई-शिवाई: ₹2504 - ₹1812
थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये कमी खर्चात जास्त प्रवास
या योजनेमुळे थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये कमी खर्चात जास्त प्रवास, अधिक ठिकाणांची भटकंती आणि तणावमुक्त प्रवास शक्य होणार आहे. फिरायची हौस असलेल्यांसाठी ही योजना म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे.

