सार

Shiv Sena MLA Anil Babar : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Shiv Sena MLA Anil Babar : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाबर यांच्यावर सांगलीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (31 जानेवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अनिल बाबर हे सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे.

समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला – CM एकनाथ शिंदे

“आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुढे असेही म्हटले आहे की, “खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पाणी आणण्यासाठी आणि सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते.

डोक्यावर छत नसणाऱ्यांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर-आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे”.

एका संघर्षशील अध्यायाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

“ज्येष्ठ नेते व आमदार अनिल बाबर (Shiv Sena MLA Anil Babar) यांच्या निधनाने पाणी प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे, विधिमंडळात जोरदार आवाज उठवणारे निर्भिड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे”, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे की, “खानापूर-आटपाडी मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी सातत्याने लढा देणाऱ्या आमदार अनिल बाबर (Shiv Sena MLA Anil Babar) यांचे जीवन संघर्षशील होते. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलने केली. त्यांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे तरुण आमदारांसाठी मार्गदर्शक होती. 

त्यांच्यासारख्या नेतृत्वाचे निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणाची, पाणी प्रश्न चळवळीची मोठी हानी आहे. आमदार अनिल बाबर (Shiv Sena MLA Anil Babar) यांचे जीवन हे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन, प्रेरणा देत राहील”, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करून बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अनिल बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 

आणखी वाचा :

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Green Hydrogen Project : हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 7 कंपन्यांसोबत सामंजस्य करार, 64 हजार रोजगार निर्मिती होणार - CM एकनाथ शिंदे