Jyoti Waghmare: राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन सर्वांना चकित केले आहे. 

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ आणि राहुल शेवाळे यांसारख्या बड्या नेत्यांची नावे चर्चेत असताना, शिवसेनेने आपल्या तडफदार प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे?

केवळ एक राजकारणी नसून एक प्रगल्भ विदुषी आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. सोलापूरच्या मातीतील या लेकीने आपल्या कर्तृत्वाने थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहापर्यंत झेप घेतली आहे.

शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रवास

पाच भाषांवर प्रभुत्व: मराठी, हिंदी आणि इंग्रजीसोबतच त्यांना तेलगू आणि कन्नड भाषाही उत्तम अवगत आहेत.

उच्चशिक्षित व्यक्तिमत्व: इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. वाघमारे यांनी दहावी-बारावीतही दैदीप्यमान यश मिळवले होते.

व्याख्याती ते नेत्या: १० वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून काम केलेल्या डॉ. वाघमारे यांनी मानवी हक्क आणि आंबेडकरी चळवळीतून आपल्या कार्याची सुरुवात केली. काही काळ त्यांनी वृत्त निवेदिका म्हणूनही आपली छाप पाडली होती.

वडिलांचा वारसा: वेटरचा मुलगा नगरसेवक, तर नात थेट खासदार!

ज्योती वाघमारे यांना सामाजिक कार्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे आक्रमक कार्यकर्ते होते. कुटुंबासाठी त्यांनी एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर आणि मजूर म्हणून काम केले, मात्र त्यांच्या जिद्दीमुळे सोलापूरकरांनी त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. वडिलांचा हाच जनसेवेचा वारसा आता ज्योती वाघमारे दिल्लीत घेऊन जाणार आहेत.

का मिळाली उमेदवारी?

१. आक्रमक प्रवक्ता: शिवसेनेची बाजू टीव्ही डिबेट्समध्ये अभ्यासपूर्ण मांडण्यात त्या आघाडीवर आहेत.

२. स्त्री-शक्तीचा सन्मान: महिलांच्या प्रश्नांवर त्यांचे मोठे संशोधन असून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत.

३. बहुभाषिक संपर्क: महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात त्यांची व्याख्याने गाजतात, ज्याचा फायदा पक्षाला विस्तार करण्यासाठी होऊ शकतो.

दिग्गज नेत्यांना बाजूला सारून एका सामान्य कुटुंबातील, उच्चशिक्षित आणि लढाऊ महिलेला संधी देऊन एकनाथ शिंदेंनी 'सामान्य कार्यकर्ताही नेता होऊ शकतो' हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.