Ravindra Chavan New BJP Maharashtra President : रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली असून, फडणवीसांनी त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक नेतृत्वात आज मोठा बदल झाला. रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली असून, भाजपने आगामी निवडणुकांसाठी नव्या जोमात तयारी सुरू केल्याचं संकेत मिळाले आहेत. मुंबईतील वरळी डोममध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण पार पडला.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सूत्रं स्विकारली
सध्याचे महसूल मंत्री आणि मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपवली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, विनोद तावडे, तसेच शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भाजपा नेते उपस्थित होते. कार्यक्रमाची भव्यता एवढी होती की, अनेकांना उभं राहूनच सोहळा पाहावा लागला!
नाराजीपासून नेतृत्वापर्यंत, चव्हाण यांचा प्रवास
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने काहीसे नाराज असलेले रविंद्र चव्हाण यांना अखेर पक्षश्रेष्ठींनी दिलेलं आश्वासन पाळलं. जानेवारी 2025 मध्ये राज्य कार्याध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर, आजच्या निवडीनं त्यांच्या राजकीय प्रवासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
कोकणातील प्रभाव, संघटनेचा अनुभव
डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले चव्हाण हे भाजपच्या युवा मोर्चातून कार्यरत असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, चार वेळा आमदार, मंत्री आणि प्रदेश सरचिटणीस अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला प्रवास, आज भाजपच्या सर्वात महत्त्वाच्या राज्य नेतृत्वाच्या पदापर्यंत पोहोचला आहे.
फडणवीसांचे कौतुक आणि अपेक्षा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या कोकणातील संघटनात्मक योगदानाचं कौतुक केलं. "भाजपच्या विस्तारासाठी चव्हाण यांचं नेतृत्व उपयुक्त ठरेल. संघटनात नवा उत्साह निर्माण होईल," असं त्यांनी नमूद केलं.
पुढील निवडणुकांसाठी नवचैतन्याची सुरुवात
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप महाराष्ट्रात नव्या रणनीतीने निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष संघटनेला आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलाला निश्चितच होणार, असा विश्वास भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येतो आहे.
जेपी नड्डा यांच्याऐवजी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या तयारीत भाजप
भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोमवारी अनेक राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यामागे पक्ष लवकरच आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याऐवजी नवीन अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेकडे वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपच्या संविधानानुसार, राष्ट्रीय अध्यक्षांचा निवडप्रक्रिया तेव्हाच सुरू होऊ शकते जेव्हा ३७ पैकी किमान १९ राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड पूर्ण झालेली असेल. सोमवारीपर्यंत १६ राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष जाहीर झाले असून मंगळवारी ही संख्या १९ च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रिया मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


