काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रवक्ते आणि राज्य नियोजन महामंडळाचे माजी अध्यक्ष रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रत्नाकर महाजन यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाजन यांच्या निधनाने काँग्रेससह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
समाजवादी विचारांनी प्रेरित राजकीय-सामाजिक प्रवास
रत्नाकर महाजन हे पेशाने डॉक्टर होते. मात्र, समाजवादी विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि ग. प्र. प्रधान यांसारख्या पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. समाजवादासोबतच आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांनी आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात स्विकार केला. आणीबाणीच्या काळात महाजन यांनी सक्रियपणे काम केले होते. या काळात रत्नाकर महाजन यांना तुरुंगवासही भोगावा लागला. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपला वैचारिक आणि राजकीय प्रवास पुढे सुरू ठेवला.
राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले
रत्नाकर महाजन यांनी राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही रत्नाकर यांनी काम केले. सामाजिक प्रश्न, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांचा सखोल अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. पुढे ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते झाले. पक्षाची भूमिका मांडताना अभ्यासपूर्ण आणि संयमी भाषाशैली हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले.
प्रभावीपणे मांडली पक्षाची बाजू
डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसची राजकीय पिछेहाट होत असताना पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी रत्नाकर महाजन यांनी पार पाडली. राजकीय चर्चांमध्ये ते अभ्यासपूर्ण युक्तिवादासाठी ओळखले जात होते. राजकारणातील चर्चेचा स्तर घसरत असताना, आक्रमक भाषा किंवा वैयक्तिक टीका न करता विरोधकांसमोर आपली भूमिका ठामपणे मांडण्याची त्यांची शैली विशेष ठरली. राजकीय नैतिकता, संयम आणि विषयाचा सखोल अभ्यास यामुळे प्रवक्ते म्हणून रत्नाकर महाजन यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
अभ्यासू आणि संयमी नेतृत्वाची पोकळी
राजकीय मतभेद असले तरी वैचारिक भूमिका तर्काच्या आधारे मांडणे, सार्वजनिक चर्चेचा दर्जा कायम राखणे आणि राजकीय नैतिकतेचे भान जपणे, ही रत्नाकर महाजन यांच्या सार्वजनिक जीवनाची वैशिष्ट्ये होती. काँग्रेसशी शेवटपर्यंत निष्ठा कायम ठेवणारे आणि पुरोगामी विचारांशी बांधील राहिलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. रत्नाकर महाजन यांच्या निधनाने काँग्रेसने एक अभ्यासू, संयमी आणि निष्ठावंत नेता गमावल्याने महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातही त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


