सार

चिपळूणमधील सह्याद्री भागात अवकाळी पावसाचा कहर केला आहे. मे महिन्यात अडरे, अनारी भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाणीच पाणी झाले असून जोरदार पाऊस झाल्याने नद्यांमध्ये पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे.

चिपळूण: चिपळूणमधील सह्याद्री भागात अवकाळी पावसाचा कहर केला आहे. मे महिन्यात अडरे, अनारी भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाणीच पाणी झाले असून जोरदार पाऊस झाल्याने नद्यांमध्ये पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होताना दिसत आहे. काही तास पावसाच्या सरी बरसल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. परंतु, चिपळूणमध्ये रविवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाचे व्हिडिओ समोर येत आहेत. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे, अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या.

मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले. जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला. या गावातील पाण्याने तुडुंब भरुन गेलेली शेतं आणि दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला, याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाला आहे.