- Home
- Maharashtra
- रेशनधारकांनो, ही बातमी वाचाच! गहू, तांदूळ मिळाले की नाही? SMS वरून एका सेकंदात खात्री!
रेशनधारकांनो, ही बातमी वाचाच! गहू, तांदूळ मिळाले की नाही? SMS वरून एका सेकंदात खात्री!
Get Ration Details On SMS: पिंपरी-चिंचवडमधील रेशन कार्डधारकांना आता त्यांच्या धान्य वितरणाची संपूर्ण माहिती, जसे की प्रमाण, तारीख, थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणारय. सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकतेसाठी पुरवठा विभागाने ही सेवा सुरू केली.

धान्य घेतलं का? पावती मिळाली का? आता रेशन वितरणाची खात्री थेट तुमच्या मोबाईलवर!
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील रेशन कार्डधारकांसाठी मोठी सुविधा सुरू झाली आहे. आता तुम्हाला धान्य मिळाले की नाही, किती मिळाले आणि कोणत्या तारखेला मिळाले. याचा संपूर्ण तपशील थेट तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि खात्रीशीर करण्याच्या उद्देशाने पुरवठा विभागाने ही नवी डिजिटल सेवा लागू केली आहे.
या माध्यमातून लाभार्थ्यांना ज्वारी, गहू, तांदूळ किंवा इतर धान्याचे मिळालेले किलो, त्याचा मोफत कोटा आणि वितरणाची तारीख असा सर्व तपशील त्वरित कळणार आहे.
नोव्हेंबर महिन्यातील वितरणाचा तपशील पाठवला
शहरातील मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात मिळालेल्या धान्याचा तपशील एसएमएसद्वारे पाठवण्यात आला आहे. या संदेशात व्यक्तिगत नावावर मिळालेल्या धान्याचे किलोवार विवरण स्पष्ट नमूद केलेले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत हा संपूर्ण कोटा केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मोफत देण्यात येतो, हेही एसएमएसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याची सूचना देण्यात आली आहे.
तक्रारींसाठीचे टोल-फ्री क्रमांक
1800224950, 1967
एसएमएस मिळाला नाही? ‘मेरा रेशन’ ॲप तुमच्या मदतीला
तांत्रिक कारणांमुळे काही नागरिकांना एसएमएस न मिळाल्यास त्यांच्यासाठी ‘मेरा रेशन ॲप’ हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.
यावर तुम्ही आधार क्रमांक टाकताच
मंजूर धान्य कोटा
प्रत्यक्ष मिळालेला कोटा
रेशन दुकानातील उपलब्धता
हे सर्व तपशील एका क्लिकमध्ये पाहता येतात. वितरणात होणाऱ्या तफावती ओळखण्यासाठी हे ॲप नागरिकांसाठी महत्त्वाचे साधन ठरत आहे.
मोबाइल नंबर लिंक करणे अत्यावश्यक
धान्य वितरणाचे एसएमएस मिळण्यासाठी मोबाईल क्रमांक रेशन कार्डाशी जोडणे अनिवार्य आहे. मोबाईल लिंक केल्यानंतर पुढील महिन्यात मिळणाऱ्या धान्याचा तपशील कोणते आणि किती धान्य मिळणार याचाही मेसेज मिळू लागेल.
लवकरच आवश्यक सुधारणा केल्या जाणार
दरम्यान, काही भागांत चुकीचे एसएमएस गेल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने त्यांचा तपास सुरू केला असून लवकरच आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत.

