केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना मोठी ऑफर दिली आहे. देशात सध्या टीएमसीमध्ये फूट पडल्यानंतर इतर प्रादेशिक राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलय करण्याचा प्रस्ताव दिला जात आहे. या दरम्यान आठवले यांनी गे मोठे वक्तव्य केले आहे. 

मुंबई : दशात राजकारणात सध्या टीएमसीमध्ये मोठी फूट पडल्याने राजकीय भूकंप झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्या संभाव्य विलयाच्या चर्चांना उधाण आले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री Ramdas Athawale यांनी एक महत्त्वपूर्ण राजकीय प्रस्ताव मांडला आहे. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलय करण्याचा विचार करण्याऐवजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत यावे, अशी ऑफर त्यांनी दिली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की, Sharad Pawar हे देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. पवारांच्या राजकीय अनुभवाचा फायदा NDA ला होऊ शकतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी तसेच राज्यातील राजकीय स्थैर्यासाठी शरद पवार यांनी NDA मध्ये सहभागी होण्याचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य विलयाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षांची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये एकसंघपणे लढण्यासाठी काही नेत्यांकडून अशा प्रकारच्या चर्चांना चालना मिळत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (SP) किंवा काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळे यांनी याबाबत काहीही माहित नसल्याचं म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी पुढे सांगितले की, जर शरद पवार यांना भाजपसोबत थेट जाणे योग्य वाटत नसेल, तर त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून NDA मध्ये सहभागी होण्याचाही पर्याय विचारात घ्यावा. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू असून, त्याचा परिणाम भविष्यातील आघाड्यांवर आणि निवडणूक रणनीतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे राज्यातील सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.