Pune Water Cut: पुणे महानगरपालिकेने येत्या गुरुवारी (20 नोव्हेंबर 2025) शहरात मोठ्या पाणी कपातीची घोषणा केली आहे. पर्वती आणि वडगावसह अनेक जलकेंद्रांमधील दुरुस्तीच्या कामांमुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यताय.

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची अपडेट! पुणे महानगरपालिकेने जाहीर केले आहे की येणार्‍या गुरुवारी (20 नोव्हेंबर 2025) शहरातील अनेक प्रमुख भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जलदुरुस्ती, पाईपलाईन कनेक्शन आणि महत्त्वाच्या स्थापत्य कामांसाठी हा उपाय आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

कोणत्या केंद्रांमुळे होणार पाणी कपात?

नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती HLR/MLR/LLR टाक्या, पर्वती टँकर पॉइंट तसेच वडगाव, लष्कर, चिखली, वारजे, होळकर आदी जलकेंद्रांमध्ये तातडीची देखभाल व तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत.

खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत टाकण्यात आलेल्या 3000 मिमी व्यासाच्या रॉ वॉटर पाइपलाईन, तसेच दोन 1400 मिमी लाइनचे कनेक्शन, फ्लो मीटर बसविणे, बटरफ्लाय व्हॉल्व्हची बसवणी, वॉल्व्ह तपासणी आणि वडगाव जलशुद्धीकरण फेज-२ च्या क्षमतेत वाढ करण्यासाठीचे कोअर कटिंग – या सर्व कामांसाठी गुरुवारी पाणीपुरवठा थांबवणे आवश्यक आहे.

कधी राहणार पाणी बंद?

गुरुवार (20-11-2025)

सकाळी 6.00 ते रात्री 12.00 — संपूर्ण पाणीपुरवठा बंद

शुक्रवार (21-11-2025)

पाणीपुरवठा उशीरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता

यांना होणार सर्वाधिक परिणाम

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राखालील सर्व टाकी परिसर, चांदणी चौक GSR, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब GSR, वारजे GSR, शिवणे इंडस्ट्रीज, एसएनडीटी HLR/MLR, चतुश्रुंगी टाकी, होळकर जलकेंद्र, जुने वारजे जलकेंद्र, तसेच नव्याने समाविष्ट गावे या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा थांबणार आहे. महत्त्वाची देखभाल सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी आवश्यक पाणी साठवून ठेवावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.