- Home
- Maharashtra
- Pune Train Update : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुढील 10 दिवस पुण्यातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द
Pune Train Update : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुढील 10 दिवस पुण्यातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द
Pune Train Update : दौंड–मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे, रेल्वे प्रशासनाने 15 ते 25 जानेवारी दरम्यान मेगा ब्लॉक जाहीर केला. यामुळे पुणे विभागातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदललेत

पुढील 10 दिवस पुण्यातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द
पुणे : पुणे रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. दौंड–मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड ते काष्टी दरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, या कामासाठी रेल्वे प्रशासनाने 15 ते 25 जानेवारीदरम्यान ‘मेगा ब्लॉक’ जाहीर केला आहे. या कालावधीत पुण्यातून धावणाऱ्या अनेक वर्दळीच्या गाड्या रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
या निर्णयाचा फटका विशेषतः पुणे–सोलापूर आणि पुणे–अमरावती मार्गावरील हजारो प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकाकडे निघण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे प्रशासनाचे महत्त्वाचे अपडेट
रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारीपासून प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून, काही मार्गांवरील सेवा पूर्णतः बंद राहणार आहेत.
14 ते 25 जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आलेल्या गाड्या
या कालावधीत प्रामुख्याने पुणे–सोलापूर मार्गावरील खालील गाड्या धावणार नाहीत.
पुणे–सोलापूर एक्स्प्रेस (12169/12170)
सोलापूर–पुणे इंटरसिटी (12157/12158)
पुणे–सोलापूर / सोलापूर–पुणे डीईएमयू (11417/11418)
पुणे–दौंड डीईएमयू (71401/71402)
तसेच 23 ते 26 जानेवारीदरम्यान खालील लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द राहतील.
पुणे–अमरावती एक्स्प्रेस (11025/11026)
अमरावती–पुणे एक्स्प्रेस (12119)
अजनी–पुणे एक्स्प्रेस (12120)
निजामाबाद–पुणे एक्स्प्रेस (11410)
पुणे–नागपूर गरीब रथ (12113/12114)
पुणे–नांदेड एक्स्प्रेस (17629/17630)
मार्ग बदललेल्या गाड्या
मेगा ब्लॉकमुळे काही महत्त्वाच्या गाड्या पर्यायी मार्गाने धावणार आहेत.
यशवंतपूर–चंदीगड एक्स्प्रेस
जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस
हजरत निजामुद्दीन–वास्को-द-गामा एक्स्प्रेस
या गाड्या मनमाड–इगतपुरी–कल्याण–पनवेल–लोणावळा मार्गे पुण्यात पोहोचतील.
सातारा–दादर एक्स्प्रेस - जेजुरी मार्गे
तिरुवनंतपुरम–CSMT एक्स्प्रेस - कुर्डुवाडी–मिरज मार्गे
शॉर्ट टर्मिनेशन व प्रवासात बदल
काही गाड्यांचा प्रवास पूर्ण दौंडपर्यंत न जाता मधल्या स्थानकांवरच थांबवण्यात येणार आहे.
इंदूर–दौंड आणि ग्वाल्हेर–दौंड एक्स्प्रेस - प्रवास खडकी स्थानकावर संपणार
24 व 25 जानेवारीला दौंड–इंदूर एक्स्प्रेस - दौंडऐवजी पुणे स्थानकावरून दुपारी 15:33 वाजता सुटणार
दौंड–ग्वाल्हेर एक्स्प्रेस - 25 जानेवारी रोजी खडकी स्थानकावरून रात्री 00:25 वाजता प्रस्थान
प्रवाशांसाठी सूचना
रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी IRCTC, NTES किंवा अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून गैरसोय टाळता येईल.

