मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस ठाण्यात गेलात?, अंबादास दानवेंचे सुनील टिंगरे व अजित पवारांना 3 प्रश्न!

| Published : May 22 2024, 03:19 PM IST

Ambdas Danve

सार

आमदार सुनील टिंगरे सांगतात की, मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गेला असेल तर मला काही प्रश्नांची उत्तरे द्या, असे अंबादास दानवे म्हणाले.

 

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून, त्याची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचं नाव जोडलं जातंय. त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचीही चर्चा आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार सुनील टिंगरे सांगतात की, मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गेला असेल तर मला काही प्रश्नांची उत्तरे द्या, असे अंबादास म्हणाले. 

अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट केली आहे. आमदार सुनील टिंगरे सांगतात की, मी दबाव टाकला नाही. मग एका फोनवर एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी कितीवेळा असे मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहचले आहात? तुम्ही पोलीस ठाण्यात मध्यरात्री का गेला होता? प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते अनेकदा अशा वेळी यासाठी थेट ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेले होते? याची उत्तरे खरं तर अजित पवारांनी दिली पाहिजे.

 

 

सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप

पुणे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केला होता. त्याानंतर हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. टिंगरे हे मध्यरात्री पोलीस ठाण्यात कशासाठी गेले होते असा सवाल विचारण्यात आला होता. यावर टिंगरे यांनी स्पष्टीकरण देखील दिले. तरी देखील स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव घेतलं जातंय. याप्रकरणी पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुणेकरांकडून केला जातोय. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली. भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक तितकाच भ्रष्ट आमदार, अशी टीका देखील केली.

अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तर सुनिल टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून मंगळवारी दुपारी कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात आतापर्यंत अजित पवारांची कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच सुनील टिंगरे हे मध्यरात्री येरवडा पोलीस स्टेशनमध्ये होते, त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप होत आहे.