सार

Pooja Khedkar Audi Car Seize : शनिवारी रात्री खेडकर यांच्या कुटुंबीयांनी गाडीच्या चाव्या चतुश्रृंगी वाहतूक पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहेत.

 

Pooja Khedkar Audi Car Seize : IAS प्रोबेशनर पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी कार पुणे वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. पूजा खेडकर यांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून खासगी कारवर व्हिआयपी नंबर प्लेटसह लाल आणि निळ्या रंगाचा दिवा लावला होता. त्यांच्या गाडीवर महाराष्ट्र सरकार असेही विनापरवाना लिहिलेले आहे. याव्यतिरिक्त एकूण 21 वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरण त्यांना 26 हजार रुपयांचाही दंड ठोठावण्यात आला आहे.

शनिवारी रात्री पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी गाडीच्या चाव्या चतुश्रृंगी वाहतूक पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्यावर वाहतूक पोलीस विभागाने मालकांना कारची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप वाहतूक विभागाकडे कागदपत्रे जमा झालेली नाहीत.

रुजू होण्यापूर्वीच सुविधांसाठी लावला होता तगादा

पूजा खेडकर यांनी ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. नऊ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर 15 एप्रिल ते 31 मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. 3 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी सुरू होण्यापूर्वीच म्हणजे एक आठवडाभरापासून 20 मे पासून जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वाहन, शासकीय निवासस्थान, कार्यालयात स्वतंत्र दालन आणि शिपाई आदी व्यवस्था करून ठेवण्याबाबत अगोदरच भेटी देऊन, व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून अधिकाऱ्यांकडे तगादा लावला होता. जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी असल्याने खेडकर यांना काही सुविधा पुरविल्या.

30 जुलै 2025 पर्यंत प्रशिक्षणाचे होते नियोजन

18 ते 21 जून (एक आठवडा) विभागीय आयुक्तालय, 24 ते 26 जून ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, 27 आणि 28 जून असे दोन दिवस जिल्हा न्यायालय, त्यानंतर 1 ते 5 जुलै जिल्हा कोषागार कार्यालय आणि पुढील इतर सर्व शासकीय शाखा, आस्थापना, कार्यालयांमध्ये प्रशिक्षणासाठी 30 जुलै 2025 पर्यंत प्रशिक्षणाचे नियोजन होते. मात्र, जिल्हा कोषागार कार्यालयातील प्रशिक्षणानंतर गैरवर्तणुकीमुळे पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना राज्य शासनाकडून वाशिम जिल्ह्यात पाठविण्यात आले.

आणखी वाचा

बंदुकीच्या व्हिडिओनंतर IAS अधिकारी पूजा खेडकर आई मनोरमा यांच्याविरुद्ध दाखल केला एफआयआर, नेमकं प्रकरण समजून घ्या